पुणे

माळेगावात भरणार ‘कृषिक’ प्रदर्शन : अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंटचे चेअरमन राजेंद्र पवार यांची माहिती

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : स्टार्टअप आणि नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविणार्‍यांसाठी दि. 3 ते 18 जानेवारी यादरम्यान होणार्‍या 'कृषिक 2023' या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात खास वेबिनारचे आयोजन करण्यात आले असून, या वेबिनारद्वारे त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर 19 ते 22 जानेवारी 2023 यादरम्यान खास शेतकर्‍यांसाठी कृषक प्रदर्शन भरविण्यात येणार आहे, अशी माहिती अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती विज्ञान कृषी केंद्र, कृषी महाविद्यालयासह अटल इन्क्युबेशन सेंटर, मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्ड विद्यापीठ (लंडन) यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी संचालक डॉ. रणवीर चंद्र आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाचे (लंडन) संचालक डॉ. अजित जावकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. या वेळी संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पवार यांच्यासह देश-विदेशातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, असे पवार यांनी सांगितले.

पवार म्हणाले की, कृषी प्रदर्शनात 170 एकर क्षेत्रावर बी-बियाणे, खते, पिकांवरील कीड व रोगनियंत्रण या आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञानावर प्रात्यक्षिक प्रकल्प उभारले जाणार आहेत. यामध्ये कृषी क्षेत्रात रोबोटचा वापर, दुग्ध आणि फळ प्रक्रिया क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, अशा प्रकारचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार असून, त्यासाठी 180 दालने असणार आहेत.

बारामतीत मायक्रोसॉफ्टकडून कृषी संशोधन केंद्र
मायक्रोसॉफ्ट कंपनी बारामती येथे कृषी क्षेत्रावर संशोधन केंद्र उभारत आहे. त्यात संशोधन, डेटा शास्त्रज्ञ, शेतकरी आणि विद्यार्थी यांना कृषी क्षेत्रातील माहितीमध्ये बदल व सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या प्रकल्पातील मशिन लर्निंग अल्गोरिदम तंत्राद्वारे जमिनीची सुपीकता वाढविणे, उत्पादनात वाढ करणे, पीकपद्धतीचे नियोजन करणे, पिकांचे आरोग्य उत्तम राखणे, गुणवत्तावाढ करणे आणि खर्च कपात करणे, यावर संशोधन केले जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT