मांजरी; पुढारी वृत्तसेवा : मांजरी बुद्रुकमधील मांजराईनगर भागातील 116 घरकुल, 72 घरकुल, सटवाईनगर, राजीव गांधीनगर, माळवाडी आणि कुंजीरवस्ती परिसरात सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. महापालिकेकडून पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध होत नाही. याविरोधात आम आदमी पार्टी, अखिल मांजराई नागरिक कृती समिती आणि नागरिकांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
नागरिकांना जोपर्यंत मुबलक पाणीपुरवठा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे नागरिक कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळवे यांनी सांगितले. प्रशासन पिण्याचे पाणी नियमित देत नसल्याने नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. परिसरामध्ये सुमारे पंचवीस हजार लोकसंख्या आहे. झोपडपट्टी भागात बहुसंख्य लोक मोलमजुरी करतात. मात्र, या भागात पिण्याचे पाणी नियमित येत नसल्याने रहिवाशांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर अधिकारी या भागातील पाणी प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन देतात. मात्र, वर्षानुवर्षे उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या अद्यापही 'जैसे थे' आहे. पिण्याचे पाणी तर नाहीच; शिवाय वापरासाठी पाणीही मिळत नसल्याने नागरिकांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. अधिकारी पाणी सोडणार्या कर्मचार्यांना हाताशी धरून हॉटेल व्यावसायिक व बिल्डरच्या सोसायट्यांत पाणी सोडण्यास प्राधान्य देत असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे.
सटवाईनगर, वेताळवस्ती, कुंजीरवस्ती, माळवाडी गावठाण, राजीव गांधी व घरकुल 106 व 72 या भागांत गेल्या आठ दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळाले नाही. प्रशासनाने झोपडपट्टी भागांत कायमस्वरूपी व पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी मांजराईदेवीसमोरील सार्वजनिक विहिरीत पुरसे पाणी सोडावे आणि ते पाणी नागरिकांना वितरित करावे, अशी मागणी सुनीता ढेकणे, सारिका प्रतापे, सविता सोनवणे, बाळासाहेब ढेकणे, दीपक जगताप, गंगाराम खरात यांनी केली आहे.
दररोज किमान 25 टँकरची गरज…
महापालिकेच्या वतीने मांजरी बुद्रुक परिसरात 13 टँकर सोडण्यात येत आहेत. यातून केवळ पिण्याचे पाणी पुरविले जाते. मात्र, लोकसंख्येचा विचार करता हे टँकर अपुरे आहेत. या भागात किमान 25 टँकरची गरज आहे. टँकरवर पाणी भरण्यासाठी नागरिकांमध्ये वादावादी, भांडण होत आहे. तसेच काही रहिवाशांना खासगी पाणी टँकर विकत घ्यावे लागत आहेत. मात्र, झोपडपट्टी परिसरात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
मांजरी बुद्रुक येथील घरकुल 172, राजीव गांधीनगर, सटवाईनगर, माळवाडी व कुंजीरवस्ती या भागातील नागरिकांसाठी दररोज पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरविले जात आहेत. तसेच, नागरिकांनी घरगुती वापरासाठी कालव्याच्या पाण्याचा वापर करावा.
– इंद्रजित देशमुख, कनिष्ठ अभियंता, लष्कर पाणीपुरवठा विभाग, महापालिका