तळेगाव: तळेगाव-चाकण महामार्गावरील जटील वाहतूक समस्या आणि रखडलेल्या रस्ते कामासाठी ठिय्या आंदोलन तळेगाव स्टेशन भागातील मराठा क्रांती चौकात रविवारी सकाळी १० वाजता तळेगाव चाकण महामार्ग कृती समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. यावेळी गेल्या पाच वर्षात बळी गेलेल्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी शोक सभेचेही आयोजन करण्यात आले आहे. या मार्गावर सतत अपघात आणि वाहतूक कोंडी सुरूच आहे. अपघात आणि दैनंदिन वाहतूक कोंडी यामुळे आजुबाजुच्या परिसरातील रहिवासी आणि वाहतूकदारांना त्रास होत आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रातील दैनंदिन जीवनही विस्कळीत होत आहे.
अपघात आणि वाहतूक कोंडीच्या समस्यापासून नागरिकांना दिलासा मिळण्याऐवजी तळेगाव-चाकण महामार्गावरील अपघातात आणि वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. याबाबत वारंवार निवेदने देऊनही परिस्थितीत बदल झालेला नाही. हे आंदोलन करण्यात येत असुन बळी गेलेल्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या बाबतचे निवेदन पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड,पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग, पुणे यांना तळेगाव चाकण महामार्ग कृती अध्यक्ष नितिन गाडे,उपाध्यक्ष दिलीप डोळस,सचिव अमित प्रभावळकर यांनी दिले आहे.