पुणे

मुलाच्या अकाली निधनानंतर नातवंडांना सांभाळण्यासाठी ते वाजवताहेत ट्रम्पेट

अमृता चौगुले

नरेंद्र साठे : 

पुणे : 'बँड वाजवायचो, चांगला पैसा येत व्हता. गाडीच्या धडकीत लेक वारला. आता नातवंडांना तर संभाळलं पाहिजे ना. बँडमधी ट्रम्पेट वाजवत होतो; त्याचाच आता आधार घेतलाय. पुण्यामधी वाईहून येतो, ट्रम्पेट वाजवतो. लोकं पैसे देत्यात. लै मदत होतीय,' डेक्कनला ट्रम्पेट वाजवत मदत गोळा करणारे वसंत पवार सांगत होते. बँडमालक असल्याने बर्‍यापैकी हातात पैसा येत होता. लॉकडाऊन झाला आणि सगळं थांबलं. वसंत पवार यांचा रोजगार गेला. डोक्यावर कर्ज. मुलाचा अपघाती मृत्यू झाला. मुलाच्या अकाली निधनानंतर नातवंडांना सांभाळण्यासाठी पवार यांनी बँडमध्ये वाजवत असलेल्या ट्रम्पेटचा आधार घेतला.

पुण्याच्या विविध रस्त्यांवर ट्रम्पेट वाजवत उदरनिर्वाह आणि नातवंडांच्या शिक्षणासाठी ते पैसा उभा करीत आहेत. वसंत पवार यांच्या मालकीचा सातार्‍यातील वाईमधील गावात बँड होता. पण, लॉकडाऊनमुळे कर्जाची रक्कम भरता आली नाही. बँड बंद झाला, त्यामुळं उदरनिर्वाहासाठी आता पवारांना गावोगाव फिरावं लागत आहे.

लहानपणापासून बँडमध्ये वाजवतोय
पंधरा वर्षांचा होतो तेव्हापासून बँडमध्ये वाजवण्यासाठी जात आहे. पुढे स्वतःचा श्री म्युझिकल ब—ास बँड कंपनी नावाचा बँड सुरू केला. एका सीझनमध्ये पन्नासपर्यंत सुपार्‍या मिळत होत्या. आता बँडच्या साहित्यासह सगळं मोठ्या भावाकडे सोपवलं आहे. आमचा उदरनिर्वाह होऊन नातवंडांचं शिक्षण सुरू राहिलं पाहिजे, त्यासाठी जोवर शक्य आहे तोवर ट्रम्पेट वाजवत राहीन….. पवार सांगत होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT