एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे गेल्या तीन दिवसांपासून पुण्यातील शास्त्री रस्त्यावर सुरू असलेले आंदोलन अखेर संपले. मात्र, शासनाने मान्य केलेल्या मागण्यांच्या पूर्ततेबाबत संभ—माची स्थिती असल्यामुळे विद्यार्थी अजूनही नाराज असल्याचे चित्र गुरुवारी पाहायला मिळाले. दरम्यान, गुरुवारी दुपारी 4 वाजता आमदार रोहित पवार गेल्यानंतर काही विद्यार्थी नाराज असल्याने येथेच आंदोलनासाठी बसले होते. त्यांची धरपकड करत पोलिसांनी काहींना ताब्यात घेतले.
शास्त्री रस्त्यावरील एमपीएससी आंदोलनाचा गुरुवारी (दि.22) तिसरा दिवस होता. आंदोलनाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दांडेकर पुलाकडे जाणार्या या रस्त्याची एक बाजू विद्यार्थ्यांच्या गर्दीने बंद झाली होती. त्यामुळे पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक वळवली होती. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील होता. विद्यार्थ्यांनी पुढे ढकललेल्या परीक्षेची तारीख जाहीर करावी तसेच कृषीच्या जागा वाढवाव्यात, यासोबतच कंबाईनच्या जागा 15,000 कराव्यात, अशी मागणी केली.
रोहित पवार म्हणाले, आम्ही लोकप्रतिनिधी फक्त पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत. या एकजुटीमुळे सरकारला काही मागण्या मान्य कराव्या लागल्या. अभिमन्यू पवार यांचेही आभार, त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या. कृषी सेवेच्या जागा राज्यसेवेतून भराव्यात, ही मागणी मान्य केली आहे. आयोगाने केलेल्या दोन टि्वटमध्ये संभ्रम आहे. सात दिवसांत हा संभ्रम दूर करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्याशी समोरासमोर बसून चर्चा करणार आहे. दोन्ही संभ्रम सात दिवसांत सोडवण्यासाठी पवार साहेब मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल.
विद्यार्थ्यांचा प्रश्न असल्याने रस्त्यावर आलो, आम्ही यात कुठलेही राजकारण करत नाही, आम्हाला सामाजिक भूमिकेतून हा प्रश्न मांडायचा आहे, मी काहीही बोलणार नाही, विद्यार्थी जे भूमिका मांडतात, त्याचा सरकारने सकारात्मक विचार करावा, सरकारला दिल्लीला जायला वेळ आहे, मात्र, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवायला वेळ नाही. सरकार विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम का निर्माण करत आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि राज्य सरकारने यावर तात्काळ निर्णय घ्यावा, जोपर्यंत या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत मी या विद्यार्थ्यांसोबत असणार आहे.- रोहित पवार, आमदार
आयबीपीएस परीक्षा आणि राज्यसेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या होत्या. यातील राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी शासनाने मान्य केली आहे. त्याचबरोबर शासनाने राज्यसेवा परीक्षेत अॅग्रीच्याही 258 जागा अॅड करण्यात याव्यात. एक वर्ष झाले कंबाईन गट ब आणि गट सी साठी कोणतीही परीक्षा जाहीर करण्यात आलेली नाही. ती जाहीर करून 15,000 जागांची जाहिरात काढावी. तसेच, आयोगाने मान्य केलेल्या मागण्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे, ती दूर करावी यासाठी आमचे आंदोलन आहे.- एमपीएससी विद्यार्थी