पुणे

पुणे : एमपीएससीच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांचा जल्लोष!

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वर्णनात्मक परीक्षा पद्धत 2025 पासून लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषणावर अखेर तोडगा निघाला. वर्णनात्मक परीक्षा पद्धत 2025 पासूनच लागू करण्यात येईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्विटरवरून जाहीर केले आहे. स्पर्धा परीक्षार्थींनी ढोल- ताशा वाजवून, पेढे वाटून आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. आंदोलन यशस्वी झाल्याने झाशी राणी चौकात विद्यार्थ्यांनी नृत्य करत जल्लोष केला.

स्पर्धा परीक्षार्थींनी केलेल्या उपोषणाला गेल्या तीन दिवसांमध्ये विविध राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. परंतु, तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे स्पर्धा परीक्षार्थींमध्ये संभ्र म होता. सलग तीन दिवस उपोषणामुळे आंदोलकांची तब्येत बिघडायला लागली होती. दोन आंदोलकांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यामुळे राज्य शासन तसेच आयोगाबद्दल स्पर्धा परीक्षार्थींमध्ये असंतोष होता. अखेर चौथ्या दिवशी आयोगाने आंदोलकांना दिलासा देत त्यांच्या बाजूने निर्णय दिला आहे. स्पर्धा परीक्षार्थींनी बालगंधर्व चौकात ढोल-ताशांच्या गजरात आनंद साजरा केला.

स्पर्धा परीक्षार्थी आणि युवक काँग्रेसच्या लढ्याला अखेर यश आले. सर्वपक्षीय नेते स्पर्धा परीक्षार्थींच्या पाठीशी उभे राहिले. जोपर्यंत नोटिफिकेशन निघणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा पवित्रा आम्ही घेतला होता. चार दिवसानंतर लोकसेवा आयोगाने नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करण्याचे नोटिफिकेशन जारी केले आहे. स्पर्धा परीक्षार्थींसह युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकार्‍यांच्या या लढ्याला अभूतपूर्व यश मिळाल्याची आमची भावना आहे. राज्य सरकारचे व आयोगाचे आभार मानतो.

                                                             – शिवराज मोरे,
                                          उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

सहा महिने हा लढा चालू होता. युवक काँग्रेसच्या माध्यमातून चार दिवसांपासून उपोषण सुरू होते. नोटिफिकेशन निघत नाही, तोपर्यंत बेमुदत उपोषण या घेतलेल्या भूमिकेमुळे राज्य सरकार आणि एमपीएससीला दळवी समितीची शिफारस स्वीकारावी लागली. महाराष्ट्रातल्या 25 लाखपेक्षा अधिक एमपीएससी विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. प्रदेश युवक काँग्रेसचा प्रतिनिधी म्हणून मला यात सहभागी होता आले आणि याचा लाभ विद्यार्थ्यांना झाला, याचा आनंद वाटतो.

                        – प्रथमेश अबनावे, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

स्पर्धा परीक्षार्थींच्या सहा महिन्यांच्या लढ्याला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या बेमुदत उपोषणाची जोड मिळाली आणि एमपीएससीला 2025 पासून नवीन पॅटर्न लागू करण्याचे नोटिफिकेशन काढावे लागले. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या लाखो उमेदवारांना फायदा होणार आहे. या लढ्याला यश आल्याचे समाधान आहे.

                                 – अक्षय जैन, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT