पुणे : गेल्या आठवडाभरापासून सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, कोरोना महामारी 2022 मध्ये संपली आहे. सध्या जगभरात सापडत असलेले एलपी.8.1 आणि एक्सईसी, एक्सएक्ससी हे व्हेरियंट सौम्य स्वरूपाचे आहेत. त्यामुळे पुन्हा महामारीची शक्यता नाही, असा अंदाज वैद्यकतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. (Pune News Update)
सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये नव्या कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाल्यानंतर पुणे शहरातही सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पुणे विमानतळावर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी वाढविण्यात येणार का? आशियाई देशांतून येणार्या प्रवाशांवर लक्ष ठेवले जाणार का? आरोग्य विभागाकडून शहरातील सर्व रुग्णालयांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात येणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मास्कचा वापर करणे, हात स्वच्छ ठेवणे आणि गरज असल्यासच गर्दीच्या ठिकाणी जाणे, अशी सूचना प्रशासनाने केली आहे. आरोग्य यंत्रणा आणि पुणे महापालिकेच्या वतीने येत्या काही दिवसांत जनजागृती मोहीमही राबवली जाणार आहे.
कोरोना महामारी संपली असली तरी कोरोना विषाणू नष्ट झालेला नाही. गेल्या तीन वर्षांत प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा सर्वांना विसर पडला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गर्दीमध्ये मास्कचा वापर करणे, हात स्वच्छ धुणे, याची सवय लावून घ्यायला हवी. भारतातून सिंगापूर, हाँगकाँगला जाणार्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यांच्याकडून कोरोना विषाणू परत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने दोन्ही ठिकाणांहून येणार्या प्रत्येक प्रवाशाची चाचणी करून घ्यावी. तसेच, कोरोना लसीकरण कार्यक्रम सक्रिय करून पुढचा बुस्टर डोस उपलब्ध करून देण्याची गरज आहे, अशी माहिती डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.
सध्या कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन व्हेरियंट सक्रिय आहे. तो सतत म्युटेशन करतो आहे. त्यामुळे जुन्या रोगप्रतिकारशक्तीला छेद दिला जात आहे. मात्र, व्हेरियंट सौम्य असल्याने एखाद्या रुग्णामध्ये कोरोनाचे निदान झाले, तरी केवळ सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसून येत आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये न्यूमोनियाची स्थिती उद्भवण्याची शक्यता कमी आहे. लसीकरणानंतर रोगप्रतिकारशक्ती एक वर्ष टिकून राहते. आता कोविडचे रूपांतर पेंडेमिकमधून इंटिग्रल व्हायरसमध्ये झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनासह खासगी रुग्णालयांनी पुन्हा कोरोना चाचण्या सुरू करणे गरजेचे आहे. तसेच, लसीकरण कार्यक्रमही पुन्हा सुरू करावा.डॉ. अमित द्रविड, विषाणूजन्य आजारांचे तज्ज्ञ
कोरोना महामारी 2022 मध्ये संपली असली, तरी कोरोनाचा विषाणू नष्ट झालेला नाही. तो विषाणू (स्पोरॅडिक) अधूनमधून डोकावत राहतो. एखाद्या राज्यात, देशात उद्रेक झाल्यास त्याला एंडेमिक म्हटले जाते. गोवर, स्वाइन फ्लू तसेच कोरोनाचे रुग्ण अजूनही सापडत आहेत. सध्याचे व्हेरियंट सौम्य आहेत आणि मृत्यूदर अल्प आहे. तरीही, सिंगापूर आणि हाँगकाँगमधून येणार्या प्रवाशांची चाचणी आणि सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू करणे आवश्यक आहे.डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र