पुणे: बिबवेवाडी परिसरातील सुपर येथील विश्वकर्मा विद्यालयाजवळ महापालिकेच्या वतीने गेल्या काही वर्षांपूर्वी आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे पादचारी पूल उभारण्यात आला आहे. हा पूल उभारल्यापासून एक महिनाही खुला राहिला नाही. यामुळे या पुलाची अवस्था ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी झाली आहे. प्रशासनाने पादचार्यांच्या सोयीसाठी हा पूल तातडीने खुला करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
महापालिकेच्या विकास निधीतून आणि तत्कालीन नगरसेवकांच्या संकल्पनेतून या ठिकणी लोखंडी पादचारी पूल उभारण्यात आला आहे. सुपर ते विश्वकर्मा विद्यालयाच्या मागील बाजूस नागरिक आणि विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणे सोयीचे होण्यासाठी या पुलाची निर्मिती केली असून, त्याच्या दोन्ही बाजूंना जाळीचे दरवाजे आहेत.
परंतु या ठिकाणी व्यसनाधीन आणि गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणांचा वावर वाढला होता. त्यामुळे या पुलाचे दरवाजे कुलूप लावून बंद करण्यात आले आहे. परिणामी, लाखो रुपये खर्च करूनसुद्धा या पुलाचा उपयोग नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी होत नाही. हा पूल बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
वास्तविक पाहता या ठिकाणी लोखंडी पुलाची गरजच नव्हती. त्या ऐवजी परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी चांगले रस्ते प्रशासनाने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. हा पूल सध्या बंद असल्यामुळे जनतेच्या कररूपी पैशाचा अपव्यय होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र गायकवाड यांनी सांगितले.
मग पूल उभारलाच कशासाठी?
सुपर परिसरातील नागरिकांसाठी चारी बाजूंना रस्ता असल्याने या ठिकाणी पादचारी पूल उभारणे गरजेचे नव्हते. याबाबत महापालिकेच्या तज्ज्ञ समितीने अभ्यास करायला हवा होता. परंतु, माजी लोकप्रतिनिधींच्या हट्टापायी व ठेकेदारांच्या हितासाठी विनाकारण खर्चाचा हा घाट घालून हा पूल उभारण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा पूल आहे. मग हा पूल उभारलाच कशासाठी, असा सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
विश्वकर्मा विद्यालयाच्या मागील बाजूस माजी लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार लोखंडी पादचारी पूल उभारण्यात आला आहे. या पुलावर महापालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च केले आहे. मात्र, सध्या हा पूल बंद असल्याने जनतेच्या कररूपी पैशाचा अपव्यय झाल्याचे दिसनू येत आहे.- राहुल गवळी, शहर संघटक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
विश्वकर्मा विद्यालयाच्या मागील बाजूस माजी लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार लोखंडी पादचारी पूल उभारण्यात आला आहे. या पुलावर महापालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च केले आहे. मात्र, सध्या हा पूल बंद असल्याने जनतेच्या कररूपी पैशाचा अपव्यय झाल्याचे दिसनू येत आहे.- राहुल गवळी, शहर संघटक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना