पौड रोड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पौड रोड परिसरातील अनेक झाडांवर खिळे ठोकून त्यावर जाहिरात फलक लावले जात आहेत. यामुळे या झाडांना इजा पोहोचत असून, त्यांच्या वाढीवर विपरीत परिणाम होत आहे. मात्र, महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. जाहिरात करण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, परिरातील अनेक लहान-मोठे व्यावसायिक पदपथावर आणि झाडांवर अनधिकृतपणे जाहिरातीचे फलक लावत आहेत.
पौड रोड भागात एमआयटी परिसर, आनंदनगर, जयभवानीनगर, शिक्षकनगर, कोथरूड डेपो, भुसारी कॉलनी, शिवतीर्थनगर या ठिकाणी रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांवर खिळे ठोकून त्यावर फलक लावून जागा विकणे, खासगी क्लास, इंटरनेट आदींच्या जाहिराती केल्या जात आहेत. हॉटेल व्यावसायिकदेखील झाडांवर रोषणाई करीत आहेत, यामुळे झाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो व त्यांना बुरशीजन्य रोग होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
खिळे ठोकून लावण्यात येणार्या जाहिरात फलकांमुळे झाडांचा जीव गुदमरत असून, याबाबत वृक्ष संवर्धन समितीही मौन बाळगून आहे. तसेच उद्यान विभाग, आकाशचिन्ह विभागाचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याने व्यवसायिक बिनधास्तपणे झाडांवर खिळे ठोकून जाहिरातबाजी करत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.
झाडांना खिळे ठोकल्याने त्यांचे आयुष्य कमी होते. अशा जाहिरात फलकांमुळे झाडांना इजा होते व कलांतराने त्यांची वाढ खुंटते. यामुळे महापालिका प्रशासनाने झाडांवर खिळे ठोकून फलक लावणर्यांवर कारवाई केली पाहिजे.
– नीलेेश शिंदे,
रहिवासी, पौड रोडपौड रोड परिसरातील झाडांना खिळे ठोकून जाहिरात करणार्यांवर नियमितपणे कारवाई केली जात आहे. तरी पण परिसराची पाहणी करून झाडांना इजा पोहोचवून जाहिराती लावणार्यांवर कारवाई केली जाईल.
-अनिल साबळे,
निरीक्षक, उद्यान विभाग, महापालिका