Pune Politics: रॅलीमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार अॅड. किशोर शिंदे यांनी वनाज ते एसएनडीटी, असा मेट्रो प्रवास करत कोणतेही शक्तिप्रदर्शन न करता शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून मोठे शक्तिप्रदर्शन करत मिरवणुका व रॅली काढून उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. कोथरूड विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपचे चंद्रकांत पाटील यांना, तर मनसेने अॅड. किशोर शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही.
चंद्रकांत पाटील यांनी मोठी रॅली काढत गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅलीमुळे कोथरूड व परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मनसेचे उमेदवार शिंदे यांनी शुक्रवारी रॅली काढून उमेदवारी अर्ज भरण्याचे नियोजन केले होते. मात्र, गुरुवारी झालेल्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी रॅली रद्द करून मेट्रोने प्रवास करून उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार शिंदे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत वनाज ते एसएनडीटी असा मेट्रो प्रवास केला. तसेच, एरंडवणे येथील अनसूयाबाई खिलारे शाळेतील कोथरूड निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी त्यांच्यासमवेत मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस, गणेश सातपुते, अजय शिंदे, शहर सचिव रामभाऊ बोरकर, माजी नगरसेविका पुष्पा कनोजिया, सुरेखा मकवान, प्रशांत कनोजिया अमोल शिंदे, राजेंद्र वेडेपाटील, गणेश शिंदे, संजय काळे, सचिन विप्र उपस्थित होते.
शहरातील वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा वेळी अर्ज भरायला जाताना रॅलीमुळे होणार्या वाहतूक कोंडीचा त्रास कोथरूडकरांना होऊ नये, त्यातच सध्या शाळांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे आम्ही मेट्रोने प्रवास करून उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला.- अॅड. किशोर शिंदे, उमेदवार, मनसे