पुणे

पुणे : अ‍ॅड. सतीश मुळीक, जितेंद्र भोसले यांच्यावर फसवणुकिचा गुन्हा

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. सतीश गजानन मुळीक, मोक्काअंतर्गत कारवाई झालेले जितेंद्र भोसले यांच्यासह अग्रजित मुळीक, राम भुजबळ या चौघांवर फसवणुकीसह मारहाणीचा गुन्हा येरवडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अ‍ॅड. मुळीक यांनी जागेच्या व्यवहारातून तब्ब्ल 1 कोटी 35 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार येरवडा पोलिस ठाण्यात कैलास बबन पठारे (55, रा. पठारेनगर, खराडी) यांनी दिली आहे.

येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कैलास बबन पठारे व आरोपी अ‍ॅड. सतीश मुळीक हे मित्र आहेत. फिर्यादी पठारे यांची स. न. 14/2 या ठिकाणी एकूण 3 हेक्टर 32 आर ही वडिलोपार्जित जमीन आहे. सदर जागेतील 79 आर क्षेत्र हे स्वस्तिक डेव्हलपर्स यांना रजिस्टर डेव्हलपमेंट अ‍ॅग्रिमेंट करून दिले होते. 10 जानेवारी 2006 रोजी करार केला होता. पठारे यांना स्वस्तिक डेव्हलपर्स यांच्याकडून 1 कोटी 35 लाख रुपये रक्कम मिळाली होती. पठारे हे रक्कम मोजण्यासाठी अ‍ॅड. सतीश मुळीक यांच्या घरी गेले होते. रात्र झाल्याने अ‍ॅड. मुळीक यांनी पठारे यांना रक्कम घरीच ठेवण्यास सांगितले. फिर्यादी पैसे मागण्यासाठी गेले असता माझ्याकडे पैसे काही दिवस राहू देत असे मुळीक यांनी सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

माजी आमदार जगदीश मुळीक यांच्याशी असलेल्या राजकीय वादातून मला त्रास दिला जात आहे. मी शिवसेनेचे काम करत असल्याने खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रकार सुरू आहे. 2006 मध्ये पठारे यांनी मला पैसे आणून दिल्याचे सांगितले जात आहे. असे असते तर ते 16 वर्ष गप्प का बसले. मी निवडणुकीत उभा राहणार असल्याने माझी प्रतिमा मलिन करण्याचे काम जगदीश मुळीक यांच्याकडून केले जात आहे, असे अ‍ॅड. सतीश मुळीक यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT