पुढारी ऑनलाईन डेस्क : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरयांना अचानक छातीत दुखू लागल्याने आज ( दि. ३१) पहाटे पुण्यातील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. त्यांची अँजिओग्राफी झाली असून शुक्रवारी (दि. १) अँजिओप्लास्टी करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या एक्स अकाउंटवरून देण्यात आली आहे.
आंबेडकर यांच्या उजव्या बाजूच्या धमणीमध्ये एक लहान ब्लॉकेज आढळला आहे. तो अँजिओप्लास्टीने सहजपणे काढला जाऊ शकतो. त्यांची प्रकृती स्थिर असून वैद्यकीय तज्ज्ञांच्या टीमकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. दुपारच्या जेवणात त्यांनी भाजी, डाळ, चपाती घेतली आहे.
बाळासाहेबांच्या अँजिओग्राफीचा अहवाल उद्या सकाळी १० वाजता प्रसारमाध्यमांसमोर येणार आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून कुणीही प्रश्न विचारून व्यत्यय आणू नये, अशी विनंती आंबेडकर कुटुंबियांकडून करण्यात आली आहे. पुढील ३ ते ५ दिवस ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली राहणार आहेत.