पुणे: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत सोडतीद्वारे 1 लाख 1 हजार 916 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला आहे, तर प्रवेशासाठीच्या प्रतीक्षायादीत 85 हजार 406 विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली आहे. प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 14 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत प्रवेश निश्चित करता येणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी ही माहिती दिली.
आरटीईअंतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना स्वयंअर्थसाहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलिस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानित) आणि महानगरपालिकेच्या स्वयंअर्थसाहाय्यित शाळांतील 25 टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात येतो.
यंदा राज्यातील 8 हजार 863 शाळांमध्ये 1 लाख 9 हजार 87 जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यासाठी 3 लाख 5 हजार 152 अर्ज दाखल झाले आहेत. प्रवेशासाठी 10 फेब्रुवारी रोजी ऑनलाइन सोडत काढण्यात आली. त्यात 1 लाख 1 हजार 916 विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे.
प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या कागदपत्रांची नियुक्त केलेल्या पडताळणी समितीकडून प्राथमिक तपासणी करण्यात येईल. योग्य कागदपत्रे असल्यास विद्यार्थ्यांच्या नावापुढे ऑनलाइन नोंद करण्यात येईल तसेच पालकांकडील प्रवेशपत्राद्वारे तात्पुरत्या प्रवेशाची नोंद करून हमीपत्र भरून घेतले जाईल. काही पालक दिलेल्या तारखेस कागदपत्र पडताळणीस उपस्थित राहू न शकल्यास त्यांना पुन्हा दोन संधी दिल्या जातील. त्यामुळे प्रवेशासाठी पडताळणी समितीला संपर्क साधवा.
पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई संकेतस्थळावरील सूचना पाहाव्यात. दिलेल्या मुदतीनंतर शाळेत जागा रिक्त असल्या, तरी प्रवेश दिला जाणार नाही. खोटी किंवा चुकीची माहिती भरून प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही टप्प्यावर प्रवेश रद्द करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तक्रार नोंदविण्याचे आवाहन
आरटीई प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने नियमानुसार राबवली जात आहे. पालकांनी प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये. गैरप्रकार निदर्शनास आल्यास शिक्षण विभागाच्या ई-मेलवर अथवा प्रत्यक्ष पुराव्यासह तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यात 18 हजारांवर विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर
पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी 960 शाळांमध्ये 18 हजार 498 जागा उपलब्ध झाल्या होत्या. त्यासाठी 61 हजार 573 विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते, तर 18 हजार 161 विद्यार्थ्यांना आता प्रवेश जाहीर झाले आहेत.