येरवडा : पुढारी वृत्तसेवा : येरवडा परिसरात नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने महापालिका प्रशासनाने केलेल्या नाले सफाईच्या दाव्याची पोलखोल झाली. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पूरस्थिती निर्माण झालेल्या भागाची रविवारी पाहणी केली. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी या वेळी संबंधित अधिकार्यांना दिल्या.
येरवडा परिसरातील कॉमर्स झोन, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, शास्त्रीनगर, येरवडा क्षेत्रीय कार्यालय परिसर, फिनिक्स मॉल परिसर, फोर पॉईंट हॉटेल परिसर तसेच वाघोली परिसरातील पाणी तुंबणार्या ठिकाणांची या वेळी पाहणी करण्यात आली. विभागीय अधिकारी किशोरी शिंदे, सहायक आयुक्त चंद्रसेन नागटिळक, सोमनाथ बनकर, डॉ. सिद्धार्थ धेंडे, डॅनियल लांडगे, मंगेश गोळे, अविनाश शिंदे, सुशीला शिंदे, रेखा चव्हाण, विशाल बोर्डे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक या वेळी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटीमधून वाहणारा नाला बॉम्बे सापर्स या ठिकाणी बंद करण्यात आला आहे. तो तातडीने खुला करून देण्यात यावा. अग्रसेन शाळा ते कॉमर्स झोन या ठिकाणी जमा होणारे पाणी 'सर्वे ऑफ इंडिया'च्या परिसरात सोडण्यात यावे, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड ते शास्त्रीनगर चौक परिसरातील नाल्याचा प्रवाह मोकळा करून देण्यासाठी त्यावरील अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावीत आदी सूचना या वेळी भोसले यांनी संंबंधित अधिकार्यांना केल्या.
येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात तुंबले होते. या पाण्याचा प्रवाह मोकळा करून देण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. मंगळवारी (दि. 18) सर्व विभागांच्या अधिकार्यांची बैठक बोलवण्यात येणार असून, परिसरात पूरस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येईल. तसेच यासाठी लागणार्या निधीस तातडीने मान्यता देण्यात येईल आणि उपाययोजनांची कामे लवकर सुरू करण्यात येतील.
– डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, महापालिका
हेही वाचा