पुणे: महापालिकेत आर्थिकदृष्ट्या मलईदार विभाग म्हणून ओळखल्या जाणार्या बांधकाम विभागातून पदोन्नतीने बदली झालेल्या काही अभियंत्यांची पुन्हा बांधकाम विभागातच बदली करण्याचा अजब निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नियम धाब्यावरून बसवून करण्यात आलेल्या या बदल्यांमध्ये मोठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.
महापालिकेच्या 72 अभियंत्यांची पदोन्नती आणि बदल्यांची प्रक्रिया नुकतीच पार पडली. आज मंगळवार (दि.1 एप्रिल) पासून हे अभियंते बदलीच्या ठिकाणी रुजू होणार आहेत. मात्र, पदोन्नतीने करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे आता समोर आले आहे. एका विभागातून (खाते) तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर संबंधित अभियंता कर्मचार्यांची अन्य विभागात बदली करण्याचा नियम आहे.
मात्र, हा नियम धाब्यावरून बसवून काही कर्मचार्यांची पुन्हा सद्य:स्थितीत असलेल्या विभागामध्येच पुन्हा बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. हा विभाग म्हणजेच महापालिकेतील मलईदार विभाग म्हणून ओळख असलेला बांधकाम विभाग आहे. या विभागामधील चार अभियंत्यांची पुन्हा त्याच विभागात बदली करण्याचा अजब निर्णय घेण्यात आला आहे.
सय्यद हबीब अ. रेहमान अब्दुल, विजय कुमावत, इरफान शेख, अभय कुमार शिंदे या चार अभियंत्यांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे चार अभियंत्यांचीच ‘बांधकाम’मधून ‘बांधकाम’मध्ये बदली करण्यात आल्याने या बदल्यांमध्ये आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची चर्चा रंगली आहे.
विशेष म्हणजे बदल्यांमधील हा गोलमाल लक्षात येऊ नये, यासाठी बदल्यांच्या आदेशावर सध्याचे खाते शहर अभियंता कार्यालय आणि बदलीचे ठिकाण ‘बांधकाम’ असा उल्लेख करण्यात आला आहे.ते अभियंते पुन्हा बांधकाम विभागातपदोन्नतीने बदली झालेल्या अभियंत्यांमध्ये काही अभियंत्यांचे बांधकाम विभागाचे प्रेम उघड झाले आहे. सद्य:स्थितीला ज्या विभागात हे अभियंते काम करत आहेत. त्या विभागात काम करण्यापूर्वी ते बांधकाम विभागातच होते.
त्यानंतर लगेचच त्यांची पुन्हा बांधकाममध्येच बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये किरण कलशेट्टी, रणजित मुटकुले, नीलेश सैतवाल, दत्तात्रय चव्हाण यांचा समावेश आहे. यामधील काही अभियंत्यांना पुन्हा पुन्हा बांधकाम विभागातच संधी दिली जात असल्याचे दिसून येत आहे.
...तरीही आयुक्तांनी काढले बदल्यांचे आदेश
महापालिकेत प्रामुख्याने वर्ग 2 च्या अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश हे अतिरिक्त महापालिका आयुक्तांच्या स्तरावर होतात. त्यानुसार या सर्व पदोन्नती आणि बदल्यांचा निर्णय अतिरिक्त आयुक्तांनी घेणे अपेक्षित असतानाच आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्वत:कडे या बदल्यांची फाइल घेऊन यासंबंधीचे आदेश काढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.