मार्केट यार्डातील कोंडी फुटण्यासाठी एप्रिल उजाडणार File Photo
पुणे

मार्केट यार्डातील कोंडी फुटण्यासाठी एप्रिल उजाडणार

बाजार समिती प्रशासनाकडून नियोजन सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गुलटेकडी मार्केट यार्डातील अडते तसेच शेतकर्‍यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने पाऊल उचलले आहे. मार्केट यार्डातील कोंडी फुटण्यासाठी प्रशासनाच्या वतीने नवीन नियमावली तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यापासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असून, लवकरच बाजार परिसर कोंडीमुक्त होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शहराची प्रमुख बाजारपेठ असलेल्या गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात वारंवार सुरक्षा एजन्सी बदलूनही वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. त्याअनुषंगाने मुख्य प्रवेशद्वारालगत जाळीबाहेर वाहने लावण्यास मनाई करणे, रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र लेन तयार करणे, गाळा पूर्ण भरल्यानंतरच जादा जागेवर शेतीमाल उतरविण्यास परवानगी देण्याच्या द़ृष्टीने नियोजन सुरू आहे.

याखेरीज आडत्यांनी गाळ्यांवरील मागील जागा रिकामी ठेवून पुढील जागेत माल लावू नये. वाहनचालकांनी त्यांचे वाहन आखून दिलेल्या पट्ट्यात उभे करणे, नियमाने ठरवून दिलेल्या जागेतच अडत्यांनी शेतमालाची विक्री करावी, जादा शेतीमाल आवक झाल्यास पहिली गाडी खाली करून मालविक्री झाल्यानंतरच दुसर्‍या गाडीस प्रवेश देण्याच्या द़ृष्टीने प्रशासन विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बाजार घटकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने मार्केट यार्डात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर प्रशासनाकडून कारवाईही करण्यात येत आहे. सध्या मार्चअखेरीचे कामकाज सुरू आहे. तरीही वाहतूक कोंडी सोडविण्याच्या द़ृष्टीने काय करता येईल, यावरही काम सुरू आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या तारखेपासून मार्केट यार्ड परिसर कोंडीमुक्त करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात येईल.
- डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT