शिरूर; पुढारी वृत्तसेवा: अतिवृष्टीमुळे शिरूर तालुक्यात झालेल्या नुकसानीचा शिवसेना नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा पाहणी आणि शेतकर्यांना दिलासा देण्यासाठीचा दौरा चांगलाच यशस्वी झाला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री शिंदे गटात गेल्याने शिरूर तालुक्यात शिवसेनेला थोडीशी मरगळ आली होती. ठाकरे यांच्या दौर्यामुळे संघटनेला उभारी मिळाली आहे.
पश्चिम पट्ट्यातील मलठण, वाघाळे, वरुडे, गणेगाव खालसा, कान्हुर मेसाई या भागांत शेतकर्यांच्या हातात आलेले पीक गेले. गेल्या तीन महिन्यांपासून प्रचंड पावसाने हैराण झालेल्या शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले. तसे पाहिले तर संपूर्ण शिरूर तालुक्यालाच या वेळी अतिवृष्टीमुळे फटका बसला आहे. आदित्य ठाकरे यांनी या भागाचा पाहणी दौरा केला. त्यांच्या या दौर्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद, ठिकठिकाणी शेतकर्यांनी त्यांचे रात्री उभे राहून केलेले स्वागत, सरकारी कुठली मदत न मिळाल्याचा राग, पंचनामे नाही, यामुळे ठाकरे यांचा हा दौरा यशस्वी झाला.
आढळराव यांच्याबरोबर तालुक्यातील जास्त पदाधिकारी गेले नव्हते. सर्व जुने पदाधिकारी हे मूळ पक्षात राहिल्याने आदित्य ठाकरे यांच्या या दौर्यात सर्व जुने शिवसैनिक पुन्हा हिरिरीने दिसले. अनेक वर्षांपासून संघटनेपासून दूर गेलेले जुने पदाधिकारी आदित्य ठाकरे यांच्या दौर्यामुळे सक्रिय झाले. हाच सर्वांत मोठा फायदा या दौर्याने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला झाला आहे.
आदित्य ठाकरे यांचे मलठण येथे आगमन होताच मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. मात्र, आदित्य ठाकरे यांनी व्यासपीठावर न जाता सरळ शेतकर्यांमध्ये जाऊन आपली बैठक मांडली. 'तुम्हाला मी येथे बसलेले आवडेल ना?' अशी भावनिक साद घातली. 'कुठेही हार, पुष्पगुच्छ स्वीकारणार नाही,' हे सांगत संपूर्ण दौर्यात त्याचे पालन केले.
वाघाळे येथे थेट शेतकर्यांच्या बांधावर जात परिस्थितीची पाहणी करीत प्रांत व तहसीलदार यांच्याकडून माहिती घेऊन लवकरात लवकर शेतकर्यांना मदत मिळवून द्या, अशी विनंती केली. वरुडे येथे तर ठाकरे यांनी चक्क रस्त्यावर बसत शेतकर्यांशी संवाद साधला. ठाकरे यांची जनमानसात मिसळण्याची पद्धत व गावोगावी झालेले स्वागत व गाडीतून उतरून शेतकर्याची केलेली विचारपूस, यामुळे या दौर्यानंतर अनेक जण त्यांचे चाहते झाले.