पुणे

दंड रद्द करण्यासाठी आढावही रस्त्यावर : दै. ‘पुढारी’च्या वृत्ताची सर्वत्र दखल

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रिक्षाचालकांना लागू करण्यात आलेल्या 50 रुपये दंडाची समस्या दै. 'पुढारी' ने सोमवारच्या अंकात मांडली अन् बुधवारी (दि. 29) रिक्षा पंचायतीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव रिक्षाचालकांची ही समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरले. त्यांच्या नेतृत्वात रिक्षा पंचायतीच्या पदाधिकारी आणि रिक्षाचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
योग्यता प्रमाणपत्राच्या (फिटनेस सर्टिफिकेट/पासिंग) उशिरासाठी रोज पन्नास रुपये दंड लागू करण्याचे परिवहन आयुक्तांनी आदेश दिले आहे. त्याविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

तहसीलदार (गृह शाखा) बाळासाहेब शिरसाट यांना निवेदन देण्यात आले. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी युवराज पाटील उपस्थित होते. निदर्शनात यासीन सय्यद, सिद्धार्थ चव्हाण, सोपान घोगरे, रवींद्र पोरेडी, गौरव येनपुरे, शैलेंद्र गाडे, अशोक मिरगे, राजू चव्हाण उपस्थित होते. खजिनदार प्रकाश वाघमारे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर निदर्शनांना सुरुवात झाली.

काय म्हणाले बाबा आढावा…

एकीकडे रिक्षाचालकासारख्या गरीब घटकाला वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र संपले म्हणून रोज पन्नास रुपये दंड केला जात आहे. त्यासाठी कसलीही मुदत दिली जात नाही. दोन अडीच कोटींची व्होल्वो लक्झरी बस आणि पावणेतीन लाखांची रिक्षा दोघांनाही रुपये सहाशे फिटनेस फी व उशिरासाठी दैनिक 50 रुपये दंड आकारला जात आहे. हा विरोधाभास शासन संस्थेला दिसत नाही. शासन आणि प्रशासनात नैतिक फिटनेस उरला आहे का? तो संपल्यामुळेच व्यवस्थेची लक्तरे रोज वेशीवर टांगली जात आहेत आणि अशी व्यवस्था रिक्षाचालकासारख्या दुबळ्या घटकाच्या मागे लागत आहे. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. योग्यता प्रमाणपत्राच्या उशिरासाठी एका जरी रिक्षावर कारवाई झाली, तर 95 व्या वयातही सत्याग्रह केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.

वाहतूकविषयक दंड करण्याचे मूळ उद्दिष्ट वाहतुकीला शिस्त लावणे, हे आहे. मात्र, आता शासनानेच वाहतूक नियमभंग हा आपल्या उत्पन्नाचा नवीन मार्ग म्हणून स्वीकारला आहे. त्यामुळे वाहतूक नियमभंगासाठी भरमसाट दंड निश्चित केले गेले आहेत. फिटनेस उशिरासाठी रुपये पन्नास रोज लागू करणे, हा त्याचाच एक भाग आहे. मात्र, यामुळे योग्यता प्रमाणपत्र घेण्यात आर्थिक प्रश्नामुळे परिवहन वाहनधारक दिरंगाई करतील. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक धोक्यात येईल, हे व्यापक भान ठेवून यात मध्यम मार्ग काढण्याची गरज आहे.

– नितीन पवार, सरचिटणीस, रिक्षा पंचायत

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT