पुणे

पुणे : सुटीच्या दिवशीही आधार सेवा केंद्र सुरू

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नागरिकांच्या आधार अद्ययावतीकरणाला गती देण्यासाठी शासकीय सुटीच्या दिवशीही आधार सेवा केंद्र सुरू राहणार आहेत. आधार अद्ययावतीकरण करणे बाकी असलेल्या सर्व नागरिकांनी आधार केंद्रात जाऊन अद्ययावतीकरण करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आवाहन केले आहे. ज्या नागरिकांनी 2012 पूर्वी आधार कार्ड काढलेले आहे, परंतु मागील 19 वर्षांमध्ये अद्ययावत (अपडेट) केलेले नाही अशा नागरिकांनी त्यांचे आधार अद्ययावत करून घेणे गरजेचे आहे. सद्य:स्थितीत पुणे जिल्ह्यात 30 लाख 26 हजार 823 इतक्या नागरिकांचा आधार तपशील अद्ययावत करणे प्रलंबित आहे.

आधार अद्ययावतीकरणाला वेग देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी आधारच्या जिल्हा नोडल अधिकारी रोहिणी आखाडे यांच्या उपस्थितीत आधारचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक मनोज जाधव, जिल्ह्यातील आधार नोंदणी करणार्‍या बँका, पोस्ट कार्यालय, महिला व बालविकास विभागाचे प्रतिनिधी यांच्या सोबत बैठक घेतली. विशेष मोहीम म्हणून 15 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये तालुका, मंडल, क्षेत्रीय कार्यालयस्तरावर 'आधार डॉक्युमेंट अपडेट पंधरवडा' राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

'माय आधार' अ‍ॅप डाऊनलोड करा
'माय आधार' अ‍ॅप आणि आधार संकेतस्थळाचा अवलंब करून नागरिक आपले आधारमधील नाव, पत्ता, मोबाईल नं., जन्मतारीख, भाषा अद्ययावत करू शकतात. आधार सेवा केंद्रामध्ये आधार तपशील अद्ययावतीकरणासाठी 50 रुपये शुल्क भरावे लागते. मात्र, या अ‍ॅप व संकेतस्थळावरून 14 जून 2023 पर्यंत नागरिकांनी स्वत: आधार अद्ययावतीकरण केल्यास त्यासाठी कोणतेही शासकीय शुल्क आकारण्यात येणार नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT