पुणे; पुढारी वृत्तसेवा : शाळकरी मुलांमध्ये ताप येणे, घसा खवखवणे, डोळे लाल होणे, जुलाब होणे अशा तक्रारींमध्ये अचानक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बालरोगतज्ज्ञांच्या मते, 70 टक्के आजारी मुलांमध्ये अॅडिनो व्हायरसची लक्षणे दिसत आहेत. प्रतिकारशक्ती क्षीण असलेल्या मुलांना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे.
अॅडिनो व्हायरस विषाणूची वाढ श्वासनलिका, आतडे, डोळा, मूत्रमार्गाच्या अस्तरांवर होतो. या विषाणूमुळे सर्दी, न्यूमोनिया, पचनासंबंधीचे आजार आणि मूत्रसंसर्ग होऊ शकतो. 5 ते 15 या वयोगटातील मुलांमध्ये विषाणूचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जाणवत आहे. आजाराची लक्षणे पूर्णतः निघून जाण्यास किमान 7 दिवसांचा कालावधी लागतो.
संसर्गाचे प्रमाण रोखण्यासाठी मुलांना बाहेरून आल्यावर नियमितपणे हात धुवायला सांगावे. या आजारावर कोणताही विशिष्ट उपचार नाही. परंतु, मुलांमधील लक्षणांवरून डॉक्टर औषधोपचार देत आहेत. पालकांनी मुलांमध्ये बदल दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून ताप, घसा आणि मूत्रसंसर्गावर प्रोबायोटिक्स, तर डोळ्यांकरिता ड्रॅाप्स दिले जात आहेत. मुलांना गर्दीत नेणे टाळावे, हातांची स्वच्छता राखावी, अस्वच्छ हातांनी नाकातोंडाला स्पर्श करणे टाळावे, असा सल्ला नवजात शिशू व बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार पारिख यांनी दिला.
मुलांमध्ये अॅडिनो व्हायरसचा संसर्ग वाढताना दिसत आहे. अॅडिनो व्हायरस स्पर्श, खोकणे किंवा शिंकण्यातून पसरण्याचा धोका असतो. याव्यतिरिक्त संक्रमित वस्तूला स्पर्श केल्याने, तोंड, नाक किंवा डोळ्यांना स्पर्श केल्याने या विषाणूची लागण होऊ शकते. लहान मुलांचे डायपर बदलतानाही पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
– डॉ. सम्राट शहा