पुणे

इंदापूरच्या द्राक्ष शेतीला अमेरिकन तंत्राची जोड

अमृता चौगुले

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा :  वातावरणातील बदलामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी तसेच द्राक्ष शेतीमधील उत्पादन खर्च कमी करण्यासाठीचे तंत्रज्ञानाबाबत अमेरिकास्थित फार्म एक्स कंपनीचे मुख्य तांत्रिक अधिकारी बिल जेनिंग्ज व कृषी शास्त्रज्ञांनी इंदापूरमधील द्राक्षबागांची पाहणी केली. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र व महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्र इंदापूर यांच्या सहकार्याने तालुक्यातील शेतकरी उच्च प्रतीची रंगीत द्राक्ष पिकवित आहेत. मागील तीन-चार वर्षापासून अवकाळी पावसामुळे द्राक्ष मालाच्या प्रतीवर विपरीत परिणाम होत आहे. तसेच उत्पादन खर्चातही वाढ होत आहे. इंधनाचे, कामगारांचे व शेती निविष्ठांचे वाढते दर पाहता, द्राक्ष शेती अडचणीची ठरत आहे.

यावर मात करण्यासाठी अमेरिकन कंपनीच्या मदतीने शेती तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी वरील शास्त्रज्ञांनी इंदापूर तालुक्यातील बागांना भेट दिली. द्राक्ष शेतीसाठी भविष्यातील रणनीती ठरविण्यासाठी ही भेट महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे बिल जेनिंग्ज यांनी सांगितले.
महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राचे राजेंद्र वाघमोडे यांनी अमेरिकन व भारतीय आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ घालून कमी खर्चामध्ये उच्च दर्जाची द्राक्षे पिकवण्यासाठी शास्त्रज्ञांबरोबर चर्चा केली. या वेळी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. कृष्ण प्रसाद, डॉ. एस. सी. कोटूर, उमेश घोगरे, सतीश दोरकर, चंद्रकांत माळी, विजय जगताप, गणेश शिवरकर, दत्ता कांबळे उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT