बारामती : अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांचे शरद पवार यांच्याशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध जगजाहीर आहेत. हे दोघे अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेले दिसतात. रविवारी (दि. 28) अदानी परिवाराने एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बारामतीला भेट दिली. यावेळी अख्खे पवार कुटुंबीय त्यांच्या दिमतीला हजर होते. दोन्ही कुटुंबांतील जिव्हाळा यानिमित्ताने सर्व देशाने पाहिला.
बारामतीत अदानी उद्योग समूहाच्या देणगीतून ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ उभे राहिले. त्याचे उद्घाटन गौतम अदानी आणि डॉ. प्रिया अदानी यांच्या हस्ते झाले. यासाठी रविवारी सकाळी साडेदहा वाजता आलेल्या अदानी यांनी बारामतीत साडेपाच तास वेळ घालवला. सध्या राजकारणात विरुद्ध दिशेला तोंड असणारे पवार कुटुंबातील अनेक चेहरे या कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. यावेळी पवार कुटुंबाकडून अदानी यांची चांगलीच सरबराई करण्यात आली. नेहमीप्रमाणे विमानतळावरून अदानी यांच्या गाडीचे सारथ्य शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे रोहित पवारांच्या बाजूच्या सीटवर आसनस्थ झाले, तर अदानी दाम्पत्य पाठीमागील सीटवर बसलेले दिसून आले. या कार्यक्रमात पवार काका-पुतणे कानगोष्टी करतानाही दिसले. कार्यक्रमावेळी व्यासपीठावर खा. सुप्रिया सुळे यांनी स्वतः खा. सुनेत्रा पवार यांना डॉ. प्रीती अदानी यांच्या शेजारी बसण्यास सांगितले. नंतर गोविंदबागेत शरद पवार यांच्या निवासस्थानी अदानी यांच्यासाठी मेजवानी आयोजित करण्यात आली होती. यासाठी संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र उपस्थित होते.