पुणे/येरवडा; पुढारी वृत्तसेवा : जिद्द, परिश्रम आणि कष्ट यावर विश्वास असेल तर तुम्ही सर्व संकटांना तोंड देऊ शकता. रागाच्या भरात नकळत एखादी चूक घडते आणि आपल्याला या ठिकाणी यावे लागते. पण, यावर मात करून तुम्ही पुढील आयुष्य ताठ मानेने आणि सन्मानाने जगा, असे आवाहन अभिनेत्री अलका कुबल यांनी महिला कैद्यांना केले.
निमित्त होते येरवडा मध्यवर्ती कारागृह, भोई प्रतिष्ठान व आदर्श मंडळाच्या वतीने आयोजित 'प्रेरणापथ' या उपक्रमांतर्गत अलका कुबल यांच्याशी स्नेहसंवादाचे. या वेळी कुबल यांनी महिला कैद्यांशी दिलखुलास गप्पा मारल्या. आम्ही तुमची मालिका बघतो. आम्ही इथून लवकर बाहेर पडून आमच्या कुटुंबीयांसमवेत राहावे, अशी प्रार्थना देवीपर्यंत पोहोचवा, असे महिलेने कुबल यांना सांगितले.
हे ऐकून उपस्थित महिलांसोबतच पोलीस अधिकार्यांच्या डोळ्यातही अश्रू तरळले. याप्रसंगी महिला कैद्यांनी विविध गीते तसेच संवाद कुबल यांच्यासमोर सादर केले. कुबल यांनी महिला कारागृहामध्ये सुरू असलेल्या विविध रोजगार प्रकल्पांची पाहणी केली. कारागृह महानिरीक्षक पश्चिम विभाग स्वाती साठे, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी प्रास्ताविक केले. कारागृह अधीक्षक अनिल खामकर, उपअधीक्षक पल्लवी कदम, तुरुंगाधिकारी तेजश्री पवार आदी उपस्थित होते.