अशोक मोराळे
पुणे: बोपदेव घाटातील खंडणीखोर पोलिसाच्या कृत्यामुळे शहर पोलिसांच्या अब्रूची लक्तरे अक्षरशः वेशीवर टांगली आहेत. लुटारू चोरट्यांचे काम आता पोलिसच करू लागले आहेत की काय? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. एप्रिल महिन्यात येरवडा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोघा पोलिसांनी तरुण-तरुणीला धमकावून 50 हजार रुपयांची मागणी केली.
त्यापूर्वी मार्च महिन्यात बाणेर परिसरातील एका सोसायटीच्या बांधकामावर जाऊन कॉप्स-24 च्या तिघा पोलिसांनी तीन हजार रुपयांची लाच घेतली. वाहतूक पोलिसांबाबतीत न बोललेलंच बरं,ते देखील कारवाईच्या धाकाने पैसे उकळण्यात पाठीमागे नसल्याचे समोर आले आहे. (Latest Pune News)
नागरिकांना धमकावून, कारवाईच्या धाकाने ब्लॅकमेलिंग करीत पोलिसच जर अशी खंडणी उकळू लागले, तर तक्रार करायची कोणाकडे, हा देखील मोठा प्रश्न आहे. 3 ऑक्टोबर 2024 रोजी बोपदेव घाट परिसरात रात्री मित्राबरोबर फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीला कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता.
या घटनेचे तीव्र पडसात राज्यात उमटले होते. त्यानंतर पोलिसांनी घाट परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना सुरू केल्या होत्या. सीसीटीव्ही यंत्रणा, पॅनिक बटन, अंधारासाठी तीव्र प्रकाशाचे दिवे, कॉप्स-24 मार्शल, स्थानिक पोलिस ठाण्यांची चोवीस तास गस्त सुरू केली होती.
तसेच पोलिस मदत केंद्र देखील कार्यान्वित करण्यात आले होते. मात्र, याच पोलिस मदत केंद्रात कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी विक्रम वडतिले याने फोटो शूटसाठी आलेल्या चेन्नई येथील तरुणांना मारहाण करून गुन्हा दाखल करण्याच्या धमकीने 28 हजार रुपयांची खंडणी उकळली. आपल्या स्वतःच्या चारचाकी गाडीत बसवून या तरुणांना पोलिस ठाण्याच्या गेटपर्यंत घेऊन गेला.
एवढेच नाही तर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे सांगून ससून रुग्णालयात सुद्धा पोहचला. दरम्यानच्या काळात त्याचा हा प्रताप पोलिस ठाण्याच्या एखाद्या वरिष्ठ अधिकार्याच्या कसा निदर्शनास आला नाही, हा देखील एक सवालच आहे. सर्वसामान्य नागरिकांना गुन्हा दाखल करण्याचा धाक दाखवून वडतिलेसारखे निर्ढावलेले पोलिस पैसे उकळत असतील, तर हा गंभीर प्रकार आहे.
चेन्नईच्या तरुणाने धाडस दाखवून तक्रार केली म्हणून वडतिलेचा कारनामा चव्हाट्यावर आला; परंतु त्याने यापूर्वीदेखील किती जणांना लुटीची शिकार बनवले असेल, हे देखील आता पाहणे गरजेचे आहे.
कॉप्स-24 पोलिसांची लाचखोरी
एवढ्या रात्री काम का सुरू ठेवले आहे, तुमच्याबाबत डायल 112 वर तक्रार आली आहे, असे सांगून पाषाण येथील सोसायटीच्या अध्यक्षाकडून 3 हजार रुपयांची लाच कॉप्स-24 बीट मार्शलनी घेतली. या तिघांना पोलिस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे यांनी निलंबित केले. हे तीनही पोलिस अंमलदार गुन्हे शाखेचे कॉप्स-24 बीट मार्शल म्हणून कार्यरत होते. पाषाण येथील शिवालय सोसायटीच्या पार्किंगची फ्लोअरिंग खराब झाली होती. त्यावर स्लॅब टाकून दुरुस्ती करण्याचे काम रविवारी 13 एप्रिल रोजी सुरू होते.
ठेकेदाराला कामासाठी लागणारे आरएमसी उशिरा मिळाले. त्यामुळे काम उशिरापर्यंत सुरू होते. पोलिस अंमलदार हे बाणेर सीआर मोबाईल घेऊन रात्री 12 वाजण्याच्या सुमारास तेथे गेले. गाडीतून 3 अंमलदार उतरले. त्यांनी सोसायटीच्या अध्यक्षांना म्हणाले की, का काम सुरू केले आहे.
हे काम बंद करून टाका, तुमच्याविरुद्ध डायल 112 वर तक्रार आली आहे, असे सांगून तुम्ही आमच्यासोबत बालेवाडी पोलिस स्टेशनला चला, असे म्हणाले, त्या पोलिसांपैकी एक जण अध्यक्षांजवळ आला आणि म्हणाला की, तुम्ही एक काम करा, आम्हाला थोडे पैसे द्या, तुमचे काम 15 ते 20 मिनिटांत पूर्ण होईल, परत कोणाची तक्रार आली तर आम्ही अर्ध्या तासाने येतो, अर्ध्या तासाने आम्ही आल्यानंतर काम सुरू नाही पाहिजे, असे म्हणाला.
त्यावर त्यांनी किती पैसे, असे विचारल्यावर बाणेर सीआर मोबाईल गाडीचालकाने 5 हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती 3 हजार रुपये स्वीकारले. दरम्यान, याबाबत तक्रार दाखल होताच खंडणीविरोधी पथकाने केलेल्या चौकशीत या तिघांनी लाच घेतल्याचा प्रकार निदर्शनास आला.
फोन-पेवर पैसे घेणारा सहआरोपी
बोपदेव घाटातील खंडणी प्रकरणात फोन-पेवर पैसे घेणार्यालाही पोलिसांनी वडतिलेसोबत खंडणीच्या गुन्ह्यात सहआरोपी केले आहे. परंतु, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिस कारवाईदरम्यान पैसे घेताना, कोणी ऑनलाइन पैसे देत असेल तर ते चौकातील चहावाला, पानटपरीवाला तसेच पेट्रोल पंपावर पैसे घेतात.
ते देखील लोक पैसे घेण्याच्या बदल्यात ठरावीक चार्ज आकारतात. मागील महिन्यात एका वाहतूक विभागातील कर्मचार्यास रात्रीच्या नाकाबंदीतील असाच प्रकार समोर आला होता. परंतु, वरिष्ठापर्यंत हा प्रकार जाताच त्यांनी त्या तरुणाचे पैसे परत केले. त्यांनी हे पैसे घेताना एका पेट्रोल पंपावरील कामगाराच्या फोन-पेवर घेतले होते. त्यामुळे पोलिसाच्या सांगण्यानुसार जर कोणी लाचखोरीचे पैसे फोन-पे, गुगल-पेद्वारे आपल्या खात्यावर घेत असेल तर त्यांच्यासाठी हा मोठा धडा असेल.