पुणे

पुणे शहरातील अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवर होणार कारवाई

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे विभागीय आरोग्य सेवा उपसंचालकांच्या आदेशानंतर पुणे महापालिकेतर्फे शहरातील बेकायदा पॅथॉलॉजी प्रयोगशाळांवर (लॅब) कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागातर्फे शहरातील सर्व खासगी रुग्णालये आणि पॅथॉलॉजी लॅबना पत्र पाठवून पॅथॉलॉजिस्टचा तपशील सादर करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत.

डॉ. राधाकिशन पवार यांनी आरोग्य विभागाला दिलेल्या एका पत्रात महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व पॅथॉलॉजी लॅबची तपासणी करावी आणि लॅब कार्यरत नसल्यास महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल अधिनियम 2011 नुसार कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल अधिनियम 2011अंतर्गत पॅरामेडिकल कौन्सिलची स्थापना करण्यात येणार आहे.

नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्ट आणि लॅब टेक्निशियन यांच्या सर्व तपशीलांसह नोंदणी केली जाईल. कायद्यानुसार आवश्यक पॅरामेडिकल पात्रता असलेली आणि पॅरामेडिकल म्हणून नोंदणी करू इच्छिणारी कोणतीही व्यक्ती पुराव्यासह रजिस्ट्रारकडे अर्ज करू शकते आणि ठराविक शुल्क भरल्यानंतर स्वतःची नोंदणी करू शकते.

कोण काय म्हणाले?
1 आरोग्य सेवेचे पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार म्हणाले, 'पॅरामेडिकल कौन्सिलच्या निकषांचे उल्लंघन करून काम करणार्‍या पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक कारवाई करण्याबाबत महापालिकेला पत्र देण्यात आले आहे. तपासणीनंतर अहवाल पाठवण्यास सांगितले आहे. त्यानंतर अहवाल पॅरामेडिकल कौन्सिलकडे पाठवला जाईल.'

2 महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक म्हणाल्या, 'आम्ही शहरातील सर्व नोंदणीकृत पॅथॉलॉजी लॅबना पत्र देऊ आणि मुख्य पॅथॉलॉजिस्टसह त्यांच्या कर्मचार्‍यांचे तपशील सादर करण्यास सांगू. तपशील आल्यावर आम्ही पुढील कारवाई करू. पॅथॉलॉजी लॅब चालवण्यासाठी पॅथॉलॉजिस्टकडे आवश्यक पात्रता आहे की, नाही हे तपासले जाणार आहे. आम्ही प्रयोगशाळांना अचानक भेट देणार आहोत.'

SCROLL FOR NEXT