पुणे

प्रांत कटारेंवर कारवाई होईल : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे खेड विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदारांसोबत घनिष्ठ राजकीय संबंध असून, ते त्यांच्या प्रभावाखाली काम करीत आहेत, असा आरोप खेडचे प्रांताधिकारी तथा खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी केला आहे. याबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, 'प्रांतस्तरीय अधिकार्‍यांची बदली राज्य शासनाकडून होते, जिल्हाधिकारी अशी बदली करू शकत नाहीत. पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वेमार्ग आणि वर्तुळाकार रस्ता या प्रकल्पांच्या भूसंपादनाबाबत चौकशी करण्यात येत असून, या अनुषंगाने तपासणी देखील करण्यात येत आहे.

माझ्याकडे प्रत्यक्ष, मेलवर आणि पत्राने भूसंपादनाबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. या तक्रारी अतिशय गंभीर स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे भूसंपादनाचे पैसे वाटपाचे काम त्यांच्याकडून काढून दुसर्‍या अधिकार्‍याकडे देण्याचे आदेश काढले होते. या आदेशाने ते बहुधा व्यस्थित झाले असावेत. तसेच या तक्रारींच्या अनुषंगाने दोन अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांची चौकशी समिती नेमली होती. हितसंबंध नसताना पैसे वाटप करणे, तक्रार अर्जाची चौकशी करून निर्णय दिल्यानंतर त्याचे पालन न करणे, काही प्रकरणात पैसे न्यायालयात जमा न करणे, काही निर्णय फिरविण्यात आले. एखाद्या कामाचे फेरवाटप करणे, काम काढून घेणे आणि दुसर्‍याकडे देणे हे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना आहेत. दफ्तर तपासणी करणे हे अधिकार देखील जिल्हाधिकार्‍यांकडे असतात. केंद्रीय निवडणूक आयोगाने तपासणी करूनच माझी पुणे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या आरोपांवर शासनस्तरावर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी दिवसे यांनी सांगितले.

कटारे यांनी मागणी केली आहे, की मतमोजणीपूर्वी डॉ. दिवसे यांची बदली करावी; अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत स्थानिक अधिकारी, कर्मचारी पारदर्शकपणे काम करू शकणार नाहीत, अशा आशयाचे पत्र कट्यारे यांनी केंद्रीय निवडणूक आयुक्त, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि महाराष्ट्राचे प्रधान सचिव यांना बुधवारी पाठविले. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना या पत्रामुळे जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. डॉ. दिवसे यांनी पुणे जिल्ह्यातच गेल्या अनेक वर्षांपासून विविध पदांवर काम केले आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना त्यांनी माझे भूसंपादनाचे अधिकार काढून घेतले. तसेच यापूर्वी सुरू असलेल्या भूसंपादनाच्या कामाची चौकशी सुरू असताना माझ्या आणि खेड तहसीलदार यांच्या कार्यालयावर छापा टाकून झडती घेतली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT