तळीरामांनो गाडी चालवण्यापूर्वी 'थोडी' घेणं पडेल चांगलंच महागात Pudhari
पुणे

तळीरामांनो गाडी चालवण्यापूर्वी 'थोडी' घेणं पडेल चांगलंच महागात

आता तळीराम पोलिसांच्या रडारवर, रात्री 11 ते पहाटे 3 पर्यंत 27 ठिकाणी ड्रंकन ड्रायव्हिंग कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Pune News: मद्य प्राशन करून वाहने चालविणार्‍या तळीरामांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी शहरात तब्बल 27 ठिकाणे कारवाईसाठी निश्चित केली आहेत. रात्री अकरा ते पहाटे तीन वाजेपर्यंत ड्रंकन ड्रायव्हिंगची कारवाई केली जाणार आहेत. त्यासाठी 125 पोलीस अधिकारी कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे.

एवढेच नाही तर वाहतूक विभागाचे एक सहायक पोलीस आयुक्त कारवाईवर लक्ष ठेवून असणार आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. मद्य प्राशन करून वाहने चालविणार्‍यांचे प्रमाण शहरात वाढत असल्याचे पोलिसांच्या (Police) निदर्शनास आले आहे.

त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी (Police) ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील विविध भागांत 27 ठिकाणी रात्रीच्या वेळी नाकाबंदी करून ड्रंकन ड्रायव्हिंगची कारवाई करण्यात येणार आहे. ब्रीथ अ‍ॅनालायझर या मशिनद्वारे ही कारवाई केली जाते.

मद्य प्रशान केलेल्या संशयित व्यक्तीला या मशिनमध्ये फुंक मारण्यास सांगितले जाते. त्यासाठी आता प्रत्येक वेळी डिस्पोजल पाइप वापरण्यात येणार आहेत. प्रत्येक व्यक्तीसाठी हा पाइप नव्याने वापरला जाणार आहे.

तर दुसरीकडे शहर, परिसरात वाहतूक नियमभंगाचे प्रमाण मोठे आहे. बेशिस्त वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहन चालवत असल्याने गंभीर अपघात घडतात. विरुद्ध दिशेने वाहन चालविणार्‍या चालकांवर कडक कारवाईचा इशारा अमितेश कुमार यांनी दिला आहे. बेशिस्त वाहनचालकांचे वाहन सहा महिन्यांसाठी जप्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून वेळोवेळी मोहीम राबविण्यात येते. कारवाई करूनही वाहनचालक सर्रास वाहतूक नियमभंग करत असल्याचे दिसून आले. विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, मोबाईलवर संभाषण, एकाच दुचाकीवरून तिघांचा प्रवास (ट्रिपल सीट), मद्य पिऊन वाहन चालविणे, मोटार चालविताना आसनपट्टा (सीट बेल्ट) न लावणे, अशा प्रकारचे नियमभंग सर्रास केले जातात.

बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालविताना आढळल्यास वाहन चालकाविरुद्ध कारवाई करण्यात येईल, तसेच सहा महिन्यांसाठी वाहन जप्त करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

वाहतूक पोलिसांकडून गेल्या पंधरा दिवसांत 25 हजारांहून जास्त बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली आहे. शहरात गंभीर स्वरूपाचे अपघाताचे प्रमाण जास्त आहे. वाहतूक पोलिस दिवसभरात दोन सत्रांत काम करतात. वाहतूक शाखेतील 850 पोलिस कर्मचारी दोन सत्रांत विविध चौकांत वाहतूक नियमन करतात, असे त्यांनी नमूद केले.

पोलिसांनी 15 दिवसांत केलेली कारवाई?

  • विरुद्ध दिशेने जाणारे वाहनचालक - 21 हजार 285

  • ट्रिपल सीट - 2 हजार 872

  • मद्य पिऊन वाहन चालविणे - 570

  • जप्त केलेली वाहने - 215

  • (कारवाईची आकडेवारी 1 ते 16 पर्यंतची)

मद्यपान करून वाहने चालविणार्‍यांचा बंदोबस्त करण्यासाठी वाहतूक विभागाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. रात्री 11 ते पहाटे 3 वाजेपर्यंत शहरात 27 ठिकाणी ड्रंकन ड्रायव्हिंगची कारवाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, ट्रिपल सीट वाहन चालविणार्‍यांची गंभीर दखल घेतली जाते आहे. तसेच वाहने जप्तीची देखील कारवाई करण्यात आली आहे.
- अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT