पुणे

पुणे : ‘रॅपिडो बाईक’वर आजपासून कारवाई

अमृता चौगुले

पुणे : शहरात बेकायदा रॅपिडो बाईक टॅक्सीवर आता धडक कारवाई करण्यात येणार असून, त्यासाठी 'आरटीओ'कडून 12 मोटार वाहन निरीक्षकांची या कारवाईसाठी नेमणूक करण्यात आली आहे. आज(दि. 1)पासून या विशेष मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शहरात अनधिकृतरीत्या बाईकवर प्रवाशांची वाहतूक करून रिक्षाचालकांच्या पोटावर पाय आणला जात आहे, असा आरोप करून रिक्षाचालकांनी सोमवारी तीव्र स्वरूपाचे चक्का जाम आंदोलन केले.

त्यामुळे 'आरटीओ'कडून आता या बेकायदा प्रवासी वाहतूक करणार्‍या बाईक टॅक्सीविरोधात कारवाई करण्याकरिता विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत 640 गाड्यांवर कारवाई करुन 45 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आम्ही उद्यापासून (दि. 1) बेकायदा बाईक टॅक्सींवर तीव्र स्वरूपाची कारवाई करणार आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी सांगितले.

'बाईक टॅक्सीवर कारवाई करा'
शहरात अनधिकृतरीत्या बाईक टॅक्सी सुरू आहेत. त्यामुळे आमचा धंदा बुडतो आहे. त्यामुळे आरटीओने बाईक टॅक्सी चालविणार्‍यांवर कडक कारवाई करावी, असे पत्र शहरातील विविध रिक्षा संघटनांनी एकत्र येत बुधवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांना दिले. रिक्षा संघटनांचे बाबा कांबळे, एकनाथ ढोले, मोहम्मद शेख, विलास केमसे, अन्सारी शेख, आनंद तांबे, किशोर चिंतामणी व अन्य उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT