पुणे

पिंपरी : पत्राशेड, हातगाड्यांवर दुसर्‍या दिवशीही कारवाई

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरामधील प्रमुख रस्ते, पदपथ तसेच, महत्त्वाच्या चौकात असलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई शुक्रवारी (दि.28) दुसर्‍या दिवशीही करण्यात आली. त्यात पत्राशेड, टपर्‍या, हातगाड्या, फ्लेक्स, आदींवर कारवाई करीत जप्त करण्यात आले.

22 हातगाड्या जप्त

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, शहर अभियंता मकरंद निकम, सहाय्यक आयुक्त राजेश आगळे यांच्या नियंत्रणाखाली शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण पथकाने निगडी परिसर, कुणाल आयकॉन रोड, पिंपळे सौदागर रोड, चिखली, सेक्टर क्रमांक 10, मोहननगर, चिंचवड, डांगे चौक परिसर, ह प्रभागातील महत्त्वाचे रस्ते, डी. वाय पाटील रोड, जाधववाडी, निगडीतील ओटा स्कीम, स्पाईन रोड, इंद्रायणीनगर, भोसरी, सांगवी आदी भागांत कारवाई सुरू करण्यात आली.

कारवाईत 22 हातगाड्या, 60 टपर्‍या, 2 टेम्पो, 530 फ्लेक्स, बॅनर व किऑक्स, 70 जाहिरात बोर्ड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच, 45 पत्राशेड तोडण्यात आले. पालिकेचे क्षेत्रीय अधिकारी, अभियंते, अधिकारी कर्मचारी, अतिक्रमण निरीक्षक, बीट निरीक्षक, पोलिस दल, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ जवानांच्या पथकाने ही कारवाई केली.

आकुर्डीत झोपड्या हटविल्या

येथील गुरुद्वारा चौक ते धर्मराज चौक येथील ताडपत्री बांबूच्या सहायाने बनविलेल्या काही झोपड्या हटविण्यात आल्या. तसेच मटण, चिकनची दुकाने, चहा, वडापाव तसेच गादीचे दुकान, छोटे-मोठे व्यावसायिक यांनी अतिक्रमण केलेल्या जागेवर कारवाई करून ते पाडण्यात आले. शहरामध्ये अतिक्रमण विरोधी मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी क्षेत्रीय अधिकार्‍यांना दिले होते. त्यानंतर आकुर्डीतील अतिक्रमण हटविण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT