पुणे; पुढारी वृत्तसेवा : अनधिकृत व्यावसायिकांची वाढती संख्या आणि त्यातून निर्माण होत असलेल्या विविध समस्यांमुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी नामदार गोखले (फर्ग्युसन) रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई केली. ही कारवाई पुढील काही दिवस वारंवार केली जाणार असून, परवानाधारक पथारी व्यावसायिकांचे इतर ठिकाणी पुनर्वसन केले जाणार आहे. महापालिकेने शहरातील इतर रस्त्यांसह गोखले रस्त्यास 'नो हॉकर्स' (ना फेरीवाला) क्षेत्र जाहीर केले आहे.
असे असतानाही गोखले रस्त्यावर सातत्याने अनधिकृत विक्रेते ठाण माडूंन पदपथावर व्यवसाय करतात. केवळ व्हीआयपी दौर्यावेळीच हे विक्रेते गायब होतात. याशिवाय येथील परवानाधारक पथारी विक्रेत्यांकडूनही ठरवून दिलेल्या जागेच्या बाहेर अतिक्रमण केले जाते. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने या रस्त्यावर कारवाईला सुरुवात केली आहे.महापालिकेच्या विधी विभागाच्या सल्ल्यानुसार तातडीने न्यायालयाकडे ही स्थगिती उठविण्याची मागणी केली जाणार आहे. तसेच, गोखले रस्त्यावरील सर्व अनधिकृत स्टॉल हटविण्यात येतील. परवानाधारक स्टॉसचे योग्य जागी पुनर्वसन केले जाईल, असे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.
सर्व स्टॉलवर कारवाई करणार
मोकळ्या जागेत छोटे छोटे स्टॉल उभारून तिथे कपडे, पादत्राणे, ज्वेलरी तसेच सौंदर्यप्रसाधनांची विक्री चालते. हे स्टॉल अतिशय कमी जागेत एकमेकांना खेटून आहेत. या ठिकाणी आग लागल्यास किंवा अन्य दुर्घटना घडल्यास अनर्थ ओढवू शकतो. त्यामुळे या सर्व स्टॉलवर कारवाई केली जाणार आहे, असे जगताप यांनी सांगितले.