बाणेर; पुढारी वृत्तसेवा: औंध येथे अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत बांधकाम व टपर्यांवर कारवाई करून जवळपास 18 हजार 900 स्क्वेअर फिट जागा रिकामी करण्यात आली. औंध येथील वाहतूककोंडी होणारा भाले चौक, नागरस रोड तसेच सर्जा हॉटेल लेन या परिसरामध्ये ही अतिक्रमण कारवाई करण्यात आली. दुकाने, हॉटेलसमोरील साईड मार्जिन व अनधिकृत टपर्या काढण्यात आल्या आहेत. ही कारवाई दोन जेसीबी व एक गॅस कटर, 10 बिगारी यांच्या साह्याने करण्यात आली असून, या वेळी बंदोबस्तासाठी सहा पोलिस कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी महापालिकेचे अधिकारी सुनील कदम, गजानन सारने, विठ्ठल मुळे, समीर गडई आदी उपस्थित होते.
भारती विद्यापीठ परिसरात अतिक्रमणे काढली
धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय, बांधकाम नियंत्रण विभाग झोन पाच आणि अतिक्रमण परवाना विभाग यांच्यातर्फे त्रिमूर्ती चौक ते भारती विद्यापीठ परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. भारती विहार सोसायटी व पीआयसीटी कॉलेज रस्ता ते थोरवे शाळा रस्त्यासमोर काही दुकानदारांनी केलेले तात्पुरते अनधिकृत बांधकाम व पत्रा शेडवर ही कारवाई करण्यात आली.
या वेळी पत्रा शेड बोर्ड, विक्रीसाठी ठेवलेले साहित्य, किराणामाल, स्टॉल, काउंटर, फ्रीज, लोखंडी पत्रे, खुर्च्या-टेबल आदी साहित्य जप्त करण्यात आले. सात डंपर, दोन जेसीबी, 10 कर्मचारी व पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. उपअभियंता सुनील अहिरे, शाखा अभियंता शैलेंद्र काथवटे,अभियंता भूषण बाविस्कर, अतिक्रमण निरीक्षक राउते यांनी यांच्या पथकाने ही कारवाई केली.