पुणे : पुढारी वृत्तसेवा : बांधकामांसाठी मैला शुद्धीकरण प्रकल्पात (एसटीपी) शुद्ध केलेले पाणी न वापरता महापालिकेच्या आदेशाला धाब्यावर बसविणार्या बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांवर अखेर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार 208 बांधकाम व्यावसायिकांना काम बंद करण्याची नोटीस देण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी
दिले आहेत. पाणी टंचाईमुळे पालिका प्रशासनाने बांधकामांसाठी पिण्याचे पाणी न वापरता एसटीपीतील प्रकल्पातील पाणी वापरणे बंधनकारक केले आहे. बॅच मिक्स प्लांट, मॉलमधील कुलिंग टॉवर, वॉशिंग सेंटरसाठी देखील प्रक्रिया केलेले पाणीच वापरावे लागणार आहे. तसेच याबाबत अनेकदा आवाहन करूनही बांधकाम व्यावसायिकांकडून मात्र त्यासंबधीची अंमलबजावणी होत नाही.
बांधकाम व्यावसायिकांच्या सोईसाठी महापालिकेने 'पीएमसी एसटीपी टँकर सिस्टीम' नावाचे अॅपही तयार केले आहे. व्यावसायिकांना नोंदणी करून टँकरद्वारे पाणी घेता येणार आहे. या अॅपवर नक्की किती व्यावसायिकांनी नोंदणी आणि किती व्यावसायिक एसटीपीचे पाणी वापरतात याची माहिती घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त बिनवडे यांनी गुरूवारी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि उप अभियंता यांची एकत्रित बैठक घेतली. त्यानुसार शहरात सद्यस्थितीला 326 बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. त्यामधील फक्त 118 प्रकल्पांनी नोंदणी करून एसटीपीचे पाणी वापरण्यास सुरवात केली आहे. तर उर्वरित 208 ठिकाणी पिण्याचे पाणी किंवा बोअरींगचे पाणी वापरले जात असल्याचे समोर आले. त्यानुसार आता 208 प्रकल्पांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.