बिबवेवाडी: मार्केट यार्ड परिसरातील शिवनेरी पथावर गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत पथारी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले होते. याबाबत दै. ’पुढारी’ने सातत्याने बातम्या प्रसिद्ध करून या समस्येकडे लक्ष वेधले होते.
महापालिका प्रशासनाने त्याची दखल घेत अखेर रविवारी या रस्त्यावरील अनधिकृत पथारी व्यावसायिकांवर कारवाई केली. यामुळे या रस्त्याने अखेर मोकळा श्वास घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. (latest pune news)
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील मार्केट यार्ड पोस्ट ऑफिस ते सिटी प्राइड चौकापर्यंत शिवनेरी पथाचा भाग महापालिकेकडे देखभाल व दुरुस्तीसाठी आहे. या रस्त्यावर महापालिका स्वच्छता व इतर कामे करते. परंतु, हा रस्ता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येत आहे.
या रस्त्यावर वाहतूक कोंडी, तसेच अनधिकृत पथारी व्यावसायिकांचे अतिक्रमण, अनधिकृत पार्किंग आदी समस्यांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत नागरिकांकडून अनेक वेळा तक्रारीही करण्यात येत होत्या. परंतु, महापालिका आणि बाजार समिती प्रशासनातील समन्वयाच्या अभावी ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत होती. दै. ’पुढारी’ याबाबत सातत्याने वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
महापालिकेच्या अतिक्रमण निमूर्लन विभागाचे प्रमुख संदीप खलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी या रस्त्यावरील अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. हातगाड्या, फळांचे कॅरेट, उसाच्या गुर्हाळ्याचे साहित्य आदींसह विविध माल या वेळी जप्त करण्यात आला. ही समस्या सोडविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
महापालिका आणि बाजार समितीने शिवनेरी पथावरील अनधिकृत पथारी व्यावसायिकांवर कारवाई केल्याने या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. मात्र, प्रशासनाने कारवाईत सातत्य ठेवले पाहिजे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने पथारी व्यावसायिक पुन्हा रस्त्यावर येऊन बसत आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी कायमस्वरूपी उपायोजना होत गरजेचे आहे.- बसवराज गायकवाड, रहिवासी, प्रेमनगर