नवी सांगवी : पिंपळे गुरव येथील गजानन नगरमधील एका सात वर्षांच्या बालकावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला होता. 'भटक्या कुत्र्याचा बालकावर हल्ला' या शीर्षकाद्वारे दैनिक 'पुढारी'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांना पकडून नेले आहे.
शनिवारी भटक्या कुत्र्याने लहान मुलाच्या डाव्या हाताला तीन ठिकाणी कडाडून चावा घेतला होता. त्यात बालक जखमी झाला आहे.
जियान त्रिवेदी असे कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. राहत्या इमारतीच्या समोर मित्रांसोबत रात्री आठच्या सुमारास खेळत असताना एका कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला होता. नागरिकांनी कुत्र्याला हुसकावून लावल्याने सुदैवाने या बालकाची सुटका झाली. मुलाच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, त्याला औंध जिल्हा रुग्णालय येथे प्रथमोपचारासाठी पाठविण्यात आले होते.
कारवाईनंतर नागरिकांनी घेतला मोकळा श्वास
या संदर्भातील वृत्त दैनिक 'पुढारी'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर याची दखल घेत महापालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी अरुण दगडे यांच्या आदेशानुसार रेस्क्यू टीमकडून परिसरात धडक कारवाई करण्यात आली. या वेळी संबंधित चावा घेतलेल्या मोकाट कुत्र्याला पकडण्यात यश मिळविले. यामध्ये रेस्क्यू टीममध्ये बाळू बोकड, समा आण्णा, सचिन प्रधान सहभागी होते. परिसरातील नागरिकांनी मोकाट कुर्त्यांची धास्ती घेतली होती. गेली काही महिने येथील मोकाट कुत्र्यांनी दहशत पसरविली होती. अखेर शेवटी महापालिकेच्या पशु वैद्यकीय विभागाकडून रेस्क्यू टीमने धडक कारवाई केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला.