वानवडी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: वानवडीत संविधान चौक परिसरात अनधिकृत होर्डिंगवर वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाने कारवाई केली. संविधान चौक येथील मोकळ्या जागेत विनापरवाना उभे करण्यात आलेले ८ होर्डिंग पोलिस बंदोबस्तात काढून घेण्यात आले. यातील एक होर्डिंग महापालिकेच्या कारवाई पथकाने काढले. तसेच खासगी जागेतील ७ होर्डिंग हे मालकांनी स्वतः महापालिका अधिकाऱ्यासमोर क्रेनच्या साहाय्याने काढून घेतले. परिसरातील ६ होर्डिंग हे न्यायप्रविष्ट असल्याने व १ होर्डिंग अधिकृत असल्याने यावर कारवाई करण्यात आली नसल्याचे सहायक आयुक्त श्याम तारु यांनी सांगितले.
किवळे येथे होर्डिंग कोसळून नागरिकांना जीव गमवावा लागला. तसेच महंमदवाडी परिसरातील एका शाळेजवळील मुख्य रस्त्यावरील दोन होर्डिंग कोसळले सुदैवाने जीवित हानी झाली नाही. या दोन घटनांनंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून, अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.
वानवडीमध्ये फातिमानगर चौक, शिवरकर रस्ता, अंतर्गत रस्ते तसेच संविधान चौक परिसरात होर्डिंगचे जाळे निर्माण झाले आहे. मात्र, काही राजकीय नेत्यांच्या दबावामुळे प्रशासनाकडून अनधिकृत होर्डिंगकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.