पुणे

पुणे : रसायनयुक्त पाणी जलस्रोतांमध्ये सोडणार्‍या कंपनीवर कारवाई

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रांजणगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील एका कंपनीमधून रसायनयुक्त पाणी जलस्रोतांत जात असल्याचे तपासणीत समोर आले आहे. त्यामुळे संबंधित कंपनीची पाच लाख रुपयांची बँक हमी जप्त करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात दिली. विधिमंडळ अधिवेशनात विचारण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, 'या प्रकल्पामधून होत असलेल्या प्रदूषणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीस अनुसरून केलेल्या पाहणीदरम्यान हा प्रकल्प सखल भागात आहे.

त्यामुळे या प्रकल्पामधून निचरा झालेले पाणी संरक्षक भिंतीमधून निमगाव भोगी पाझर तलावाच्या बाजूला झिरपत असल्याचे निदर्शनास आले होते. जिल्हा आरोग्य अधिकारी पुणे यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार रांजणगाव कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जलजन्य आणि साथस्वरूपाचे रुग्ण आढळून आलेले नाहीत.' याप्रकरणी तक्रारीच्या अनुषंगाने आढळलेल्या त्रुटीनुसार संबंधित कंपनी आणि महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ यांना प्रस्तावित, अंतरिम निर्देश बजाविण्यात आले आहेत. तसेच, संबंधित उद्योगाकडून पाच लाख इतक्या रकमेची बँक हमी जप्त करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT