पुणे; पुढारी वृत्तसेवा: लुल्लानगर येथील सातव्या मजल्यावरील हॉटेलला आग लागल्यानंतर जाग आलेल्या महापालिकेने पुन्हा एकदा टेरेसवरील हॉटेल आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने बुधवारी टेरेसवरील पाच हॉटेलवर कारवाई केली आहे. काही महिन्यांपूर्वी बाणेर येथे एका इमारतीच्या टेरेसवर बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या हॉटेलला आग लागली होती. त्या वेळी महापालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील टेरेस हॉटेल व रेस्टॉरंटचा सर्व्हे करून 78 हॉटेलचालकांना नोटीस दिल्या होत्या. काहींनी कारवाईच्या भीतीने बांधकामे उतरविली, तर काहींनी बेकायदेशीरपणे व्यवसाय सुुरूच ठेवला होता.
महापालिकेने पाठविलेल्या नोटीसनंतरही हॉटेल व्यवसाय सुरू ठेवणार्या 38 हॉटेल व रेस्टॉरंटवर कारवाई करून तेथील अनधिकृत शेड, बांधकामे पाडली होती. दरम्यान, लुल्लानगर येथील ज्या हॉटेलमध्ये मंगळवारी आगीची घटना घडली. त्यामुळे पुन्हा एकदा शहरातील टेरेसवरील रेस्टॉरंट आणि हॉटेलचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने बुधवारी पाच अनधिकृत हॉटेलवर कारवाई केली आहे.
यामध्ये कोंढवा खुर्द रस्त्यावरील ब्रम्हा अंगण इमारतीच्या तिसर्या मजल्यावरील मुघर सराई रेस्टॉरंट आणि कौसरबाग येथील द सेंट्रल मॉलच्या तिसर्या मजल्यावरील हॉटेल सिल्व्हर स्पूनवर कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर लुल्लानगर येथील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले आहे. त्याचबरोबर बाणेर बालेवाडी भागातील हॉटेल डोसा आणि लिट्ल दिल्ली या हॉटेलवर कारवाई केली आहे. पोलिस बंदोबस्त मिळत नसल्यामुळे कारवाई थांबल्याचे कारण महापालिका प्रशासनाकडून देण्यात येत होते.