पुणे

पुरंदरला खासगी स्टोनक्रशरचे ग्रहण; अनेक गावांचे भवितव्य धोक्यात

अमृता चौगुले

नायगाव; पुढारी वृत्तसेवा : शिक्षणाचे माहेरघर म्हणून देशभर ओळख असलेल्या पुणे शहराजवळील पुरंदर तालुक्याची होऊ घातलेल्या नवीन प्रकल्पांमुळे वेगळी ओळख तयार झाली आहे. मात्र, याच तालुक्यात शेतकर्‍यांचा तीव्र विरोध असूनदेखील खासगी स्टोनक्रशर प्रकल्प अधिकार्‍यांच्या मनमानी कारभाराने रेटले जात आहेत. यामुळे शेतीसोबतच तालुक्यातील अनेक गावांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

अंजीर, सीताफळ, डाळिंब व इतर पिकांमुळे राज्यभरात पुरंदर तालुक्याची वेगळी ओळख तयार झाली आहे. पुरंदर उपसा, जानाई सिरसाई या योजनांमुळे शेतीला पाण्याची जोड मिळाल्याने येथील शेतकर्‍यांनी शेतीबरोबर दुग्धव्यवसायात मोठी भरारी घेतली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय विमानतळ, लॉजिस्टिक पार्क, गुंजवणी प्रकल्प, राष्ट्रीय बाजार, अशा नव्याने होऊ घातलेल्या प्रकल्पांमुळे तालुक्याची विकासाच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. यामुळे नागरिकांची आर्थिक बाजू बळकट होणार आहे.

पुरंदर तालुक्याची भौगोलिक रचना डोंगराळ असल्याचा फायदा घेत तालुक्याबाहेरील भांडवलदार धनदांडग्या व्यक्तींनी खासगी खडी क्रशर प्रकल्प या भागात उभारून जमिनीतील सोन्याची लूट करण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. अशा प्रकलपांमुळे त्या गावच्या परिसरात पाण्याची गंभीर समस्या कायमस्वरूपी उभी राहणार आहे. याचबरोबर नागरिकांच्या आरोग्याचा देखील गंभीर प्रश्न उभा राहणार आहे. निवडणुकीला मतदारांच्या घराचा उंबरा झिजविणारा तालुक्यातील एकही राजकीय नेता नागरिकांच्या अशा समस्यांची सोडवणूक करण्यासाठी धजावेनासा झाला आहे.

अशा घातक प्रकल्पांना त्या गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि शेतकर्‍यांचा तीव्र विरोध आहे. या विरोधाचा ना राजकीय नेता काळजी घेतोय, ना अधिकारीवर्ग. या सर्वांना भरडून आपली पोळी भाजण्यात पुरंदर तालुक्यातील नेतेमंडळी व प्रशासकीय अधिकार्‍यांनी जिंकण्याची शर्यत लावल्याचे दिसून येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT