पुणे

आरोपीच्या पत्नीला मारहाण प्रकरण; एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : खुनाच्या प्रयत्नातील दाखल गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीच्या पत्नीला मारहाण केल्याच्या आरोपावरून मुंढवा पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक आणि महिला पोलिस कर्मचारी अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आरती योगेश डिरे (वय 25, रा.शिंदे वस्ती, केशनगर, मुंढवा) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक समीर करपे, पोलिस उपनिरीक्षक धनंजय गाडे, महिला पोलिस कर्मचारी उज्ज्वला बनकर या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 22 नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास केशवनगर पोलिस चौकी, मुंढवा येथे घडली. दरम्यान, हा प्रकार मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्यामुळे पुढील तपासासाठी तो झिरोने दाखल करून मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा पती गोगेश डिरे याच्यावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून तो फरार आहे. त्याचा शोध सहायक पोलिस निरीक्षक करपे आणि त्यांचे साथीदार घेत होते.

डिरे हा केशनगर येथील घरी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार महिला कर्मचार्‍यांना घेऊन ते तेथे गेले. त्यांनी फिर्यादी महिलेकडे चौकशी केली असता सोमवारपासून पती घरी आले नाहीत. चौकशीसाठी फिर्यादींना केशवनगर पोलिस चौकीत आणण्यात आले होते. पोलिस उपनिरीक्षक गाडे यांनी फिर्यादींचा मोबाईल तपासला तेव्हा त्यामध्ये फिर्यादीने पतीला घरी येऊ नको, असा केलेला मेसेज आढळून आला. त्यानंतर महिला पोलिस कर्मचारी बनकर यांनी त्यांना पट्ट्याने मारहाण केली.

फिर्यादीच्या कोर्‍या कागदावर सह्या करून घेण्यात आल्या. दरम्यान, फिर्यादी यांच्या सासूबाई, भाऊ आणि चुलते हे पोलिस चौकीत आले तेव्हा त्यांना सोडून देण्यात आले. यानंतर फिर्यादी माहेरी फुगेवाडी येथे गेल्या होत्या. तेथे त्यांना ससून रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन आपल्यासोबत झालेल्या मारहाणीची माहिती दिली. त्यानंतर अपर पोलिस आयुक्तांना याबाबत लक्ष घालण्यात सांगण्यात आले होते. त्यानंतर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT