महिलेवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला सश्रम कारावासाची शिक्षा file photo
पुणे

महिलेवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला सश्रम कारावासाची शिक्षा

बारामती तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

बारामती: महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर शारिरिक जबरदस्ती केल्याप्रकरणी शरद पोपट खरात (रा. राजाळे, ता. फलटण, जि. सातारा) या आरोपीला येथील तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा आर. पाटील यांनी 10 वर्षे सश्रम कारावास व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

31 मार्च 2021 ते 12 एप्रिल 2021 या कालावधीत आरोपी खरात याने फिर्यादी महिलेला बदनामीची धमकी देऊन तिचा मुलगा घरात नसल्याचा फायदा घेत तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध निर्माण केले. तिला धमकी देऊन गलिच्छ शिवीगाळ केली.

या महिलेच्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध शारीरिक शोषण, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. सहायक पोलिस निरीक्षक यू. एम. दंडीले यांनी गुन्ह्याचा तपास करत आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्यात सरकारी वकील ज्ञानदेव शिंगाडे व अ‍ॅड. परीश रूपनवर यांनी सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासले. पीडितेने झालेली घटना न्यायालयात सविस्तरपणे सांगितली, तसेच वैद्यकीय पुरावा व परिस्थितीजन्य पुरावा सादर केला गेला. या खटल्यात सरकार पक्षाला कोर्ट पैरवीसाठी पोलिस उपनिरीक्षक नामदेव नलवडे, महिला पोलिस अंमलदार उमा कोकरे यांनी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT