खेड : खेड तालुक्यातील राजगुरूनगर शहरानजीक एका गावात १० वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या ५५ वर्षीय नराधमाला खेड पोलिसांनी अटक केली आहे. ज्ञानेश्वर उर्फ माऊलीबाबा नामदेव भोसले (रा. वडगाव पाटोळे, ता. खेड ) असे अटक आरोपीचे नाव आहे.
खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २०) दुपारी दिड वाजता पिडित मुलीचे वडील बाहेर गेले होते. त्यामुळे पीडिता घरी एकटी असताना आरोपी भोसले यांने घरात जाऊन दरवाजाची आतून कडी लावली. त्यानंतर तोंड दाबून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच झालेला प्रकार कोणालाही सांगितला तर तुला मारुन टाकीन अशी धमकी दिली. संध्याकाळी मुलीचे पोट दुखू लागल्यानंतर हा प्रकार मुलीने नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर या घटनेला वाचा फुटली. आरोपी ज्ञानेश्वर उर्फ माऊली बाबा भोसले याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील तपास खेड पोलिस करित आहेत.
दरम्यान, खेड तालुक्यात एकापाठोपाठ घडणाऱ्या अशा घटनांमुळे मुली, महिला असुरक्षित असल्याची भावना बळावत चालली आहे. गेल्या तीन चार महिन्यांत राजगुरुनगर परिसरात अशा प्रकारच्या किळसवाण्या घटना घडल्या असून यातील नराधमांना पोलिस किंवा कायद्याची भीती वाटत नसल्याचे समोर येत आहे.