बारामती: मोक्काअंतर्गत अटकेत असलेल्या तिघा आरोपींना शिवाजीनगर, पुणे येथील मोक्का न्यायालयाने अटक तारखेपासून ते 25 मार्च 2025 पर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली. शिवाय प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास भोगावा लागेल, असे आदेश विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी दिले.
किशोर ऊर्फ डाबर संजय ढोरे, अभिजित ऊर्फ छोटा डाबर अनिल ढावरे व राहुल ढावरे (सर्व रा. बसस्थानकासमोर, आमराई, बारामती) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर 2019 मध्ये पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली होती.
बारामतीत 19 डिसेंबर 2018 रोजी या तिघांनी जबरीने एका बीफ हॉटेलात घुसत हॉटेलचालकाला मारहाण करत त्याच्या खिशातून रोख रक्कम व अन्य कागदपत्रे काढून घेतली होती. कोयत्याने मारहाण करत गल्ल्यातील रक्कम जबरीने काढून घेतली होती. आम्ही भाईलोक आहोत, तुझी मस्ती जिरवतो, तू पोलिस स्टेशनला गेला तर आम्ही महिनाभर आत राहू; पण बाहेर आल्यावर पुन्हा तुमची मस्ती जिरवू, अशी धमकी त्यांनी हॉटेलचालकाला दिली होती.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता तसेच आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल, गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त केले होते. डाबर नावाची ही टोळी सातत्याने बारामतीत गुन्हेगारी स्वरूपाची कृत्ये टोळीतील सदस्यांच्या आर्थिक फायद्यासाठी करत असल्याने पोलिसांनी त्यांच्याविरोधात मोक्काअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव दिला होता. तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी या गुन्ह्याचा तपास करत दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. चंद्रकिरण साळवी यांनी काम पाहिले. जबरी चोरी व मोक्काअन्वये आरोपींना दोषी ठरविण्यात आले. यातील किशोर ऊर्फ डाबर ढोरे याला 20 डिसेंबर 2018 रोजी, अभिजित ऊर्फ छोटा डाबर याला 24 डिसेंबर 2018 रोजी, तर राहुल याला 22 जानेवारी 2019 रोजी अटक क?ण्यात आली होती. अटकेपासून ते तुरुंगात होते. अटक तारखेपासून ते 25 मार्च 2025 पर्यंत न्यायालयाने त्यांना कारावास सुनावला तसेच प्रत्येकी एक लाखाचा दंड केला.
या खटल्यात कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे, उपनिरीक्षक विद्याधर निचित, तर कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस निरीक संतोष घोळवे, प्रभारी अधिकारी म्हणून विलास नाळे यांनी कामकाज पाहिले.