खडकवासला : पुढारी वृत्तसेवा पानशेत-वरसगाव धरण खोर्यात पडत असलेल्या पावसामुळे पुण्याला 20 दिवस पुरेल इतक्या पाण्याची भर खडकवासला धरणसाखळीत गेल्या पाच दिवसांत पडली आहे. त्यामुळे पुणेकरांना थोडा दिलासा मिळाला आहे. धरणसाखळीत शनिवारी सायंकाळी पाचपर्यंत 5.23 टीएमसी (17.93 टक्के) इतका साठा झाला होता. दरम्यान, गेल्या पाच दिवसांत धरणसाठ्यात 1.05 टीएमसी पाण्याची भर पडली आहे.
गेल्या 26 जून रोजी धरणसाखळीत 4.17 टीएमसी (14.31 टक्के) पाणीसाठा शिल्लक होता. पाच दिवसांत पानशेत धरणातील पाणीसाठ्यात 5 टक्के, तर वरसगाव व टेमघरमध्ये जवळपास 3 टक्के वाढ झाली. तर वरील धरणांतून पाणी न सोडताही खडकवासला धरणात चार टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. परिसरात होत असलेल्या पावसामुळे धरण क्षेत्रातील ओढे, नाले व नद्यांतून पाण्याचे प्रवाह सुरू झाले आहेत. पावसाला जोर नसल्याने धरणसाखळीच्या पाणीसाठ्यात संथगतीने वाढ होत आहे.
पानशेत, वरसगाव धरण क्षेत्रात अद्यापही जोरदार पाऊस सुरू झाला नाही. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत शनिवारी पावसाचा जोर वाढला. शनिवारी दिवसभरात टेमघर येथे 30, वरसगाव व पानशेत येथे प्रत्येकी 19, तर खडकवासला येथे 7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, गेल्या वर्षी 1 जुलै रोजी धरणसाखळीत 2.55 टीएमसी (8.75 टक्के) इतका पाणीसाठी शिल्लक होता.
पुणे शहर परिसराला एका महिन्याला सव्वा ते दीड टीएमसी पाणी लागते. गेल्या पाच दिवसांत जवळपास सव्वा टीएमसी पाण्याची भर पडली असून, हा पाणीसाठा पुण्याला वीस दिवस पुरेल इतका आहे.
– मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग
धरणांतील सध्याचा पाणीसाठा
पानशेत : 2.19 टीएमसी (17.30 टक्के)
वरसगाव : 2.19 टीएमसी (17.06 टक्के)
टेमघर : 0.22 टीएमसी (6.01 टक्के)
खडकवासला : 0.98 टीएमसी (49.42 टक्के)