Pune News: आपण काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात निवडणूक लढवलेली नाही, त्यामुळे काँग्रेसच्या घटनेनुसार माझ्यावर निलंबनाची कारवाई होऊच शकत नाही. काँग्रेसचा पारंपरिक मतदार जपण्यासाठी मी निवडणूक लढली आहे, त्यामुळे आपल्यावरील कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी माजी उपमहापौर आबा बागूल यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे.
यासंदर्भात बागूल यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रशासन व संघटक उपाध्यक्ष नाना गावंडे, निरीक्षक रमेश चेन्निथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह वरिष्ठ नेत्यांना पत्र पाठवले आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या पर्वती मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा तीन वेळा पराभव झाला आहे.
ही सर्व परिस्थिती पक्ष श्रेष्ठींच्या निदर्शनास आणून देत हा मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्याची विनंती मी केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले गेले. काँग्रेस कार्यकर्त्यांना उभारी मिळावी, काँग्रेस विचारधारेच्या मतदारांची ‘व्होट बँक’ राखली जावी, यासाठी मी अपक्ष म्हणून निवडणूक लढली.
काँग्रेस पक्षाच्या घटनेमधील तरतुदींनुसार माझे म्हणणे ऐकून न घेता आणि खुलासा करण्याची संधी न देता निलंबनाची नोटीस देण्यात आली. मी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात निवडणूक लढविलेली नाही. त्यामुळे पक्षाच्या घटनेनुसार माझ्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकत नाही. माझे पक्षाने निलंबन केले असल्यास ते तातडीने मागे घेऊन मला काँग्रेस पक्षाचाच कार्यकर्ता असल्याचे पत्र द्यावे, अशी विनंती बागूल यांनी पत्रात केली आहे.