शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा : शिक्रापूर (ता. शिरूर) हद्दीतील गावठाणातून जाणार्या पुणे-नगर महामार्गावर सुरक्षा उपाय योजण्याची मागणी शिक्रापूर समस्या व उपाय ग्रुपच्या वतीने करण्यात आली होती. याबाबत शुक्रवारी (दि. 24) दै. 'पुढारी'मध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल घेत बांधकाम विभागाने रस्त्यावर पांढरे पट्टे मारणे, रम्बलर तयार करणे आदी कामांना तातडीने सुरुवात केल्याची माहिती या ग्रुपचे सदस्य अंकुश घारे यांनी देत ग्रुपच्या वतीने दै. 'पुढारी'चे आभार मानले.
येथील चाकण चौक, पाबळ चौक, ग्रामपंचायत कार्यालय, पोलिस ठाणे परिसर, तसेच विद्यालयाच्या परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. येथूनच अवजड, तसेच प्रवासी वाहने प्रवास करतात. गजबजलेल्या चौकांमध्ये अनेक वेळा अपघात होऊन अनेक निरपराध नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. यावर सुरक्षेचा उपाय म्हणून आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक, रम्बलर पट्टे बसवून वाहनांचा वेग कमी होतील, अशा पद्धतीने उपायोजना करणे गरजेचे असल्याचे ग्रुपने म्हटले होते. यासोबतच शिक्रापूर हद्दीतील दुभाजकावर स्ट्रीट लाईट बसवणे, तसेच ग्रामपंचायत ते रिलॅक्स पेट्रोलपंपापर्यंतचा परिसर स्कूल झोन म्हणून जाहीर करून नामनिर्देशन बोर्ड बसवावेत, तसेच या परिसरात बसथांबे उभारण्यात यावे, अशी मागणी या ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आली होती. या मागणीला प्रतिसाद देऊन बांधकाम विभागाने कामास सुरुवात केली आहे.