श्रीकांत बोरावके :
मोशी : वाहतूक नियमन करण्यासाठी केलेल्या उपाययोजना या चुकीच्या ठरल्या की अपघाताला निमंत्रण कसे मिळते, हे दाखवणारी घटना नुकतीच मोशीजवळ घडली, पण नशीब बलवत्तर म्हणून झालेल्या अपघातात जीवित हानी झाली नाही. वेळ संध्याकाळी सहाची मोशी महामार्गावर वाहनाचा वेग वाढलेला नाशिकहून येणारी एस.टी.बस चिंबळी फाटा थांबा सोडून पुढे मोशीच्या दिशेने धावती झाली. इंद्रायणी नदी पुलानजीकच्या उताराला लागल्यानंतर अचानक बस लेन सोडून लगतच्या लेनमधून जाणार्या दुचाकीस्वाराला घासली. काय झाले कोणालाच समजेना दुचाकीस्वार जखमी झाला.
वाहतूक कोंडी झाली. चालकाने आपली चूक नसल्याचे सांगितले आणि मग वाहने बाजूला घेण्यात आली. येणारी वाहने देखील या ठिकाणी घसरत होती आणि मग सर्वांच्याच लक्षात आले की, चुकीच्या रॅम्बलर स्पीडब—ेकरमुळे हा अपघात घडला. तरुणाचा जीव थोडक्यात वाचला. तर, एसटी चालकही जमावाचा मार बसण्यापासून वाचला. थोडक्यात काळ आला होता, पण वेळ आली नव्हती.
असे प्रसंग सध्या पुणे-नाशिक महामार्गावरती सारखे घडू लागले आहेत. वेग नियंत्रित व्हावा म्हणून रॅम्बलर स्ट्रीप पट्टे मारण्याची मागणी काही महिन्यांपूर्वी संबंधित प्रशासनाकडे करण्यात आली होती.
त्यानुसार महामार्गावर रॅम्बलर पट्टे मारण्यात आले होते. मात्र, हे मारत असताना काही पट्टे चुकीच्या ठिकाणी आणि अतांत्रिक पद्धतीने मारण्यात आले. हेच चुकीच्या पद्धतीचे रॅम्बलर देवदूत नसून यमदूत बनले आहेत. इंद्रायणी नदीच्या पुलाजवळ नाशिकच्या बाजूने उतारावर चुकीच्या ठिकाणी रॅम्बलर पट्टे मारण्यात आले आहेत. हे रॅम्बलरवर वाहने वेगाने आल्यास गतीरोधक म्हणून त्याचे काम व्हायला हवे किंवा त्याने वेगाला प्रतिरोध करायला हवा. मात्र, तसे न होता हे रॅम्बलर वेगाने येणार्या वाहनांची दिशाच फिरवत असून वाहने लेन सोडत शेजारच्या वाहनांवर जात आहेत. यामुळे दुचाकीस्वार किंवा शेजारच्या मोठ्या वाहनातील चालकांचा जीव देखील धोक्यात येत आहेत. यामुळे अशा चुकीच्या ठिकाणच्या रॅम्बलरचा सर्व्हे केला जावा व त्यात रॅम्बलरमध्ये तांत्रिक दोष वाटल्यास त्याची दुरुस्ती केली जावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.