ओतूर; पुढारी वृत्तसेवा : नगर- कल्याण महामार्ग हल्ली 'मौत का सौदागर' बनला असून आठवड्याभरात या मार्गावर अपघातांची मालिकाच सुरू आहे.
रविवारी (दि.२४) डिंगोरे गावच्या हद्दीत दत्तवाडीजवळ महामार्गाच्या कडेने पायी चाललेल्या पाच परप्रांतीय मजुरांना कल्याणकडून ओतूरच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कारने बेदरकारपणे चिरडले. यामध्ये दोन मजूर जागीच ठार झाले तर तिघांवर आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आणखी एक दगावल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. अपघातानंतर कारचालकाने कारसह पलायन केले असता ती कार ओतूरजवळ ओतूर पोलिसांनी शिताफीने पकडली असून कारमधील सर्वजण पुण्याचे असल्याचे समजले आहे. हा अपघात रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास घडला असून अपघातातील मृतांची व जखमींची नावे प्राप्त झालेली नाहीत.
याबाबत ओतूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांचे मार्गदर्शनात फरार झालेली कार अपघातानंतर अगदी काही वेळातच मिळवून देण्यात पोलिस हवालदार सुरेश गेंगजे, दत्ता तळपाडे, शामसुंदर जायभाय, रोहित बोबंले, राजेंद्र बनकर या पोलीस कर्मचाऱयांनी यश मिळविले आहे. ही कार किया कंपनीची असून एम एच १२ व्हीक्यू ८९०९ क्रमांकाची आहे. याबाबत अधिक तपास ओतूर पोलीस करीत आहेत.