लोणावळा : किल्ले लोहगड येथून पर्यटन करुन माघारी परतत असलेल्या विद्यार्थ्यांच्या बसचा दुधिवरे खिंडीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात बस तब्बल तीनशे फुट खोल दरीत कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभिर दुखापत झालेली नाही.
या अपघाताची माहिती मिळताच लोहगड घेरेवाडी येथील स्थानिक तरुण, शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार पेण, जिल्हा रायगड येथील साठे क्लास येथील 27 विद्यार्थी आणि शिक्षक, असे सर्वजण बसने (क्रमांक एम.एच.06.एस.9381) लोहगड येथे सहलीसाठी लोहगड परिसरात आले होते.
तेथून परतत असताना घेरेवाडी येथील तीव्र उतार असलेल्या वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस दरीत पडली. त्यापैकी एक बस लोहगड येथून खाली उतरताना दरीत पलटी झाली. या अपघातात 4 ते 5 जण जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले.