कुरकुंभ(पुणे); पुढारी वृत्तसेवा : नादुरुस्त झालेल्या एसटी बसच्या दुरुस्तीसाठी निघालेल्या एका मालवाहतूक एसटी बसचाच कुरकुंभ (ता.दौंड) घाटात अपघात झाला. रस्ता सोडून मोठ्या खड्डयात जाऊन ही बस उलटताना थोडक्यात बचावली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र, यामुळे कुरकुंभ घाटातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एसटीची एक प्रवासी बस नादुरुस्त झाली होती, त्या बसच्या दुरुस्तीसाठी दौंड डेपोची मालवाहतूक एसटी बस (एम एच 14 बी टी 0698) दुरुस्तीचे सामान घेऊन दौंडहून कुरकुंभच्या दिशेने चालक व मॅकेनिक निघाले होते. रविवारी (दि.23) रात्री दीडच्या सुमारास घाटात मालवाहतुकीच्या एस.टी.बसचा अपघात झाला.
संरक्षक कठडे नसल्याने बस रस्ता सोडून जाऊन खाली मोठ्या खड्ड्यात अडकून थांबली. चालक व मॅकेनिकल यांना दुखापत झालेली नसून, ते सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. 15 जून रोजीही प्रवाशी एस.टी.बस व खडी वाहतुकीचा टेम्पो याच्यात अपघात झाला होता. एस.टी.बस अपघाताची ही दुसरी घटना आहे.
येथे अपघातांची मालिका कायम सुरू असते. घाटाच्या वरील बाजूस धोकादायक स्थिती असून, सुरक्षा कठडे नाहीत. हा अपघात वरील बाजूस झाला असता आणि प्रवाशी वाहतुकीची बस असती तर मोठी दुर्घटना घडली असती. एखादी मोठी घटना घडण्यापूर्वी रस्ते विकास महामंडळाने ताबडतोब उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. मोठ्या प्रमाणात प्रवाशी घेऊन जाणारे वाहन म्हणजे एस.टी.बस आहे. घाटातील अरुंद रस्ते व सुरक्षिततेबाबत उपाययोजना नसल्याने वाहनांचे वारंवार अपघात घडतात. मात्र, तरीही रस्ते विकास महामंडळाकडून उपाययोजना केली जात नाही. स्थानिक ग्रामपंचायत, पोलिस प्रशासन, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावून घेण्याची गरज आहे. त्याशिवाय रस्ते विकास महामंडळाला जाग येणार नाही.
रफीक शेख, चेअरमन, वि.वि.सेवा सह. सोसायटी, कुरकुंभ
घटनेचा वृत्तांत मला आलेला नाही. त्यामुळे मी आता काहीच सांगू शकत नाही. वृत्तांत मिळवल्यानंतर अपघाताबाबत सांगेल.
विलास गावडे,
दौंड आगार व्यवस्थापक
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.