पुणे

पिंपरी : ब्रेक न लागल्याने महिला मदतनीसाचा मृत्यू

अमृता चौगुले

पिंपरी : पिंपरी येथील वल्लभनगर आगारातील गाडी जागेवरून बाजूस घेताना तिचा एअर ब्रेक न लागल्याने ती गाडी समोर उभ्या असलेल्या शिवशाही बसवर जोरात आदळली. या वेळी शिवशाही बस समोर गाडीतील ऑईल तपासणीसाठी उभ्या असलेल्या मॅकेनिक विभागातील सहाय्यक मदतनीस शिल्पा कैलास गेडाम (38, सध्या रा. दापोडी, मूळ रा. नागपूर) या दोन्ही बसमध्ये सापडून गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 8) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

वल्लभनगर आगाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, परतूर (जालना) आगाराची बस पार्किंगधून बाहेर काढण्यासाठी चालक प्रयत्न करत होता. मात्र, अहमदपूर आगाराची (लातूर) बस त्याठिकाणी उभी असल्याने परतूर बसचा वाहक प्रशांत रमेश वाडकर हा अहमदपूर आगाराची बस घेण्यासाठी चालकाच्या सीटवर बसला. त्याने ती बस सुरू केली, मात्र बसमध्ये हवा कमी असल्याने ब्रेक न लागल्याने समोर असलेल्या शिवशाहीवर ती बस जोरात आदळली.

त्या वेळी शिवशाही बसमधील ऑईलची तपासणी करणार्‍या सहायक मदतनीस शिल्पा गेडाम या दोन्ही गाड्यांच्या मध्ये सापडून त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी वल्लभनगर आगार प्रशासनाच्या वतीने पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

…तर अपघात टळला असता
अहमदपूर आगाराच्या बसमध्ये केवळ साडेचार टक्के हवा होती. साधारणपणे सहा ते आठ बार हवा असेल तर ब्रेक लागतो. मात्र, गाडी सुरू होताना हवेची तपासणी करण्यात आली नाही. तसेच हॅन्डब्रेक लावला असता तर अपघात टळला असता.

                                      – अशोक सोट, विभाग नियंत्रक, स्वारगेट.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT